
राजकारणात अनेक वेळा आडनाव, वंश, आणि ओळखीवर संधी मिळते. पण जेव्हा संघर्षातून घडलेला नेता पुढे येतो, तेव्हा संघटनेत नवा आत्मा फुंकला जातो. आज काँग्रेसच्या महाराष्ट्र युवक विंगमध्ये अशीच एक नवी संघटनात्मक चळवळ उभी राहताना दिसतेय — आणि त्याच्या केंद्रस्थानी आहेत शिवराज मोरे!
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची केलेली निवड ही केवळ पदनिर्देश नाही, तर ती आहे कार्यकर्त्याच्या कष्टांना दिलेली मान्यता. संघटनेतून वर आलेल्या नेतृत्वाला दिलेला आदर. आज महाराष्ट्र काँग्रेस जी अनेक ताणेबाण्यांनी वेढलेली आहे, तिथं युवक संघटनेचा हा नवा चेहरा नक्कीच नवसंजीवनी ठरू शकतो!
कराडमधून दिल्लीपर्यंतचा लढवय्या प्रवास…
शिवराज मोरे हे कराडचे माजी नगरसेवक बापूसाहेब मोरे यांचे पुत्र. पण त्यांच्या कुटुंबाची राजकीय परंपरा सत्तेच्या राजवाड्यांतून नव्हे, तर रस्त्यावरच्या संघर्षातून निर्माण झालेली आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना त्यांनी एनएसयुआयमधून आपला प्रवास सुरू केला. २००८ पासून ते २०१० पर्यंत त्यांनी संघटन वाढवताना महाराष्ट्रातील युवकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
राहुल गांधींच्या निवडणूक आधारित नेतृत्व संकल्पनेने त्यांनी दोन वेळा विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले. पुढे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, सरचिटणीस, उपाध्यक्ष, आणि आता अखेर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून ते पुढे आले आहेत.
‘संघटन’ हेच ‘सत्ता’ मिळवण्याचं साधन…
आज काँग्रेस महाराष्ट्रात अनेक आघाड्यांवर लढते आहे — भाजपसारख्या प्रबळ यंत्रणेशी, राजकीय विरोधकांशी, आणि पक्ष सोडून जाणाऱ्या गटबाज नेत्यांशी, अशा परिस्थितीत, “संघटनच पक्षाचा आत्मा आहे” ही ओळख पुन्हा अधोरेखित करण्याची गरज होती.
शिवराज मोरे हे ‘वरून’ लादलेले नेता नाहीत. ते आहेत खालीपासून वर आलेले, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे, त्यांचं ऐकणारे आणि प्रत्यक्ष कृती करणारे नेतृत्व. नागपूरपासून गडचिरोलीपर्यंतचा त्यांचा दौरा हेच दर्शवतो की ते केवळ खुर्चीवर बसणारे अध्यक्ष नाहीत — तर रस्त्यावर उतरून संघटन उभारणारे सैनिक आहेत.
काँग्रेससमोरील आजची आव्हानं… आणि मोरेंचा रोडमॅप…
काँग्रेस पक्ष सध्या सत्ता, साधनं आणि समाजातील प्रभाव या तिन्ही गोष्टी गमावून बसलेला आहे. विरोधकांकडे कारभार, कॅडर आणि कॅम्पेनिंगची ताकद असताना काँग्रेसकडे राहिलेला आहे — एक ऐतिहासिक वारसा.
या परिस्थितीत शिवराज मोरे यांच्यासमोर आज चार मोठी आव्हानं उभी आहेत:
१) युवकांमध्ये राजकीय आत्मविश्वास निर्माण करणं: शिक्षण, आरक्षण, बेरोजगारी, आणि महागाई यावर काँग्रेसची भूमिका वेळोवेळी स्पष्ट करत राहणं.
२) महाराष्ट्रभर संतुलित संघटन उभा करणं:
पारंपरिक काँग्रेस गडांबाहेरही संघटनेचा प्रभाव निर्माण करणं गरजेचं आहे — विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र सर्वत्रच.
३) स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०२९ पर्यंतचा पाया घालणे:
युवक काँग्रेसला लोकांच्या दरवाजापर्यंत नेऊन, “घराघरात कार्यकर्ता” ही संकल्पना प्रत्यक्षात आणावी लागेल.
४) सामाजिक प्रश्नावर रोखठोक भूमिका ;
महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत विविध सामाजिक प्रश्नांच्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची युवकांची सक्षम संघटना म्हणून तात्काळ योग्य आणि परखड भूमिका घ्यावी लागेल.. आणि नुसती भूमिकाच नव्हे तर ती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर रोखठोक मांडावी लागेल. कृतिशील कार्यक्रमांना चालना देऊन संघटनेचा समाजातील प्रभाव वाढवावा लागेल.
ही निवड केवळ नियुक्ती नाही, ती आहे घोषणा!…
काँग्रेसने जेव्हा “वंश नव्हे, क्षमता मोजली जाते” असं सांगितलं, तेव्हा ते निव्वळ शब्द नव्हते. शिवराज मोरे यांचं अध्यक्षपद ही त्याची ठोस पावलं आहेत. ही निवड म्हणजे संघटनात्मक पुनरुज्जीवनाची नांदी, आणि भविष्यातील काँग्रेसच्या नव्या चेहऱ्याची जाहीर घोषणा.
त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस युवक विंग केवळ सभा घेणारी संघटना न राहता, रस्त्यावर उतरून लढणारी, जनतेच्या प्रश्नांना भिडणारी आणि विचारांची चळवळ उभी करणारी शक्ती बनेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
शिवराज मोरेंचा नेता म्हणून प्रवास हा संघर्ष, संघटन आणि सिद्धतेचा प्रवास आहे. त्यांच्या रुपाने काँग्रेसला केवळ एक नवा नेता मिळालेला नाही, तर कार्यकर्त्यांतून जन्मलेला नेतृत्वाचा आदर्श मिळालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचा परिणाम दूरगामी ठरेल, यात शंका नाही!
— हैबत आडके, कराड | संपादक – चांगभलं न्यूज