शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती; पक्ष संघटनेला नवी उर्जा – changbhalanews
राजकियराज्य

शिवराज मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती; पक्ष संघटनेला नवी उर्जा

कराड प्रतिनिधी, दि. १ | चांगभलं वृत्तसेवा
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या संघटनात्मक स्तरावर मोठे फेरबदल करत शिवराज मोरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. युवक काँग्रेसमध्ये गत काही वर्षांपासून कार्यरत असलेल्या मोरे यांच्यावर पुन्हा एकदा काँग्रेसने विश्वास दाखवला आहे. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली असून दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब आणि राष्ट्रीय प्रभारी कृष्णा अलूवेरू यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

शिवराज मोरे यांनी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी दोन वेळा जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय युवक काँग्रेसमध्ये सरचिटणीस आणि उपाध्यक्षपदीही ते निवडणुकीद्वारे निवडले गेले होते. तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती.
एका सामान्य कुटुंबातून येणाऱ्या शिवराज मोरे यांनी गेल्या काही वर्षांत संघटनात्मक कामगिरीच्या जोरावर राज्यभर युवकांचे संघटन उभे केले आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया पक्षातील कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सांगितले की,
“काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे. मी त्या विश्वासाला पात्र राहून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करणार आहे. काँग्रेस हा सर्वात अनुभवी राजकीय पक्ष आहे आणि सध्याचा संघर्षाचा काळ पक्षाचे विचार गावागावात पोहोचविण्याचा आहे. यासाठी मी संपूर्ण राज्यभर दौरे करून युवकांना संघटित करणार आहे.”

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close