कराड अर्बन बँकेची १०८ वी वार्षिक सभा संपन्न; ५८३७ कोटींचा विक्रमी व्यवसाय, सभासदांना ८% लाभांश जाहीर

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
कराड अर्बन बँकेची १०८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२० जुलै २०२५ रोजी कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी, कराड अर्बन कुटंब सल्लागार सीए. दिलीप गुरव, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे आणि सर्व संचालक तसेच सर्व सदस्यांसह सभासदांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली होती.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा रू.५८०० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करत एकूण व्यवसाय रू. ५८३७ कोटींवर पोहोचविला आहे. यामध्ये रू. ३५७४ कोटींच्या ठेवी तर रू. २२६३ कोटींचा कर्ज व्यवसाय आहे. बँकेला एकूण रु. ४८.९५ कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी बजा जाता रु.२६.४७ कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपली सक्षमता व सदृढता कायम राखली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले.
बँकेने मागील वर्षीप्रमाणे वसुलीच्या कामकाजामध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करत जुन्या आणि नवीन एन.पी.ए. खात्यांतून लक्षणीय वसूली करत असताना नक्त एन.पी.ए. चे प्रमाण ०% इतके राखले आहे. सभासदांना ८ % लाभांश देत असल्याची घोषणा यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केली. त्याचप्रमाणे सभासदांना मागील सर्वसाधारण सभेमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत ग्राहकसेवेमध्ये वाढ करून रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी मिळविली, बँकेच्या खातेदारांनी त्याचा उपयोग करून घेतला, त्याचबरोबर युपीआय सेवादेखील बँकेने चालू केली त्यामुळे ग्राहक संख्या वाढण्यास मदत झाली. तरी सर्व सभासदांनी, ग्राहकांनी मोबाईल बँकिंग आणि युपीआय सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा. भविष्यकाळात नेट बँकिंग सुरू करण्याचा मानस आहे. बँकेने अलीकडेच ऑनलाईन फसवणुकीस आळा बसावा व सायबर हल्ल्यांपासून बचाव व्हावा त्यासाठी लागणाऱ्या सुरक्षा केंद्राची (Security Operation Center) स्थापना केली आहे. बँकेचे सध्या सात जिल्हयात कार्यक्षेत्र आहे ते वाढविण्यासाठी बँक प्रयत्नशील असेल. येत्या काळात बँक नवनवीन तंत्रप्रणालीचा वापर (Al Technology) करून ग्राहकसेवा अधिक जलद गतीने करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कराड अर्बन बँक सहकार क्षेत्रामध्ये अधिक सक्षम आणि सदृढ असेल असा विश्वास अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी यावेळी व्यक्त केला.
बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षात भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १५.२७% राखून आपली सक्षमता आणि सुदृढता आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. एकूण ६७ शाखांपैकी ३५ शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के असून निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण ०% इतके राहिले आहे. बँकेच्या ६७ शाखांपैकी एकूण ५३ शाखांनी नफा मिळवला असून २९ शाखांना रु. १ कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. नव्याने सुरू केलेल्या ०५ शाखांनी ६ महिन्यांमध्ये सुमारे ७५ कोटींचा व्यवसाय करून ग्राहकसंख्येत लक्षणीय वाढ करून दिली आहे. यातून बँकेवर समाजाचा असणारा अढळ विश्वास अधोरेखित होतो असे मत माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी यांनी व्यक्त केले.
मागील काही वर्षांपासून बँकेची विविध मार्गातून बदनामी करणाऱ्या सात सभासदांमुळे बँकेच्या व्यवसायावर कशा प्रकारे परिणाम झाला आणि त्यामुळे बँकेला कशाप्रकारे नुकसान सोसावे लागले. ह्या सभासदांकडून बँकेला नाहक त्रास वेगवेगळ्या मार्गाने देण्यात आला आहे. त्यामुळे त्या सात सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव ह्या सभेपुढे मांडून त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. असे अर्बन कुटुंब सल्लागार सीए. दिलीप गुरव यांनी यावेळी सभेत बोलताना सांगितले.
प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी स्वागत व नोटीस वाचन केले. आभार अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी मानले.
कार्यकारी संचालकपदी सीए दिलीप गुरव
सीए दिलीप गुरव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जवळपास तीन दशके बँकेच्या वाटचालीत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत अर्बन कुटुंब प्रमुख मा. सुभाषराव जोशी यांनी बँकेच्या कार्यकारी संचालक या पदावर सीए दिलीप गुरव यांची नेमणूक करण्याचा ठराव मांडला. त्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला.
📰 “आपल्या गावाची, आपल्या मनातली बातमी – फक्त चांगभलं न्यूजवर!”
📲 खालील प्लॅटफॉर्मवर आम्हाला Follow / Subscribe करा: 📷 Instagram ▶️ YouTube 🐦 X
📘 Facebook 🗞️ Dailyhunt
❤️ Like करा ↗️ शेअर करा 🔔 रहा अपडेट