साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे १०५ वी जयंती: राम दाभाडे स्वागताध्यक्षपदी एकमताने निवड

कराड | दि. १८ जुलै २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती सोहळ्याचे स्वागताध्यक्षपदी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम दाभाडे (रा. येरवळे, ता. कराड) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
या निर्णयाची घोषणा शासकीय विश्रामगृह, कराड येथे पार पडलेल्या जयंती नियोजन बैठकीत करण्यात आली. या बैठकीत माजी अध्यक्ष व पत्रकार प्रमोद तोडकर अध्यक्षस्थानी होते. बैठकीस संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, माजी अध्यक्ष रमेश सातपुते, कार्याध्यक्ष राहुल वायदंडे, संजय तडाके, दत्ता भिसे (फौजी), प्रा. पै. अमोल साठे, विनोद भोसले, गजानन सकट, भास्कर तडाके, ॲड. विशाल देशपांडे, सुरज घोलप, जगन्नाथ चव्हाण, कॉ. शशिकांत महापुरे, कृष्णत तुपे, अण्णा पाटसुपे यांच्यासह समितीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. समितीचे सचिव हरिभाऊ बल्लाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर परशुराम साठे यांनी आभार मानले.
गेली अनेक वर्षे जयंती महोत्सव समिती सातत्याने कार्यरत असून, समाजहिताचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षार्थींसाठी मार्गदर्शन शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, विविध सामाजिक विषयांवरील परिसंवाद, समाजप्रबोधन मेळावे आणि सन्मान सोहळ्यांचे आयोजन केले जाते. यावर्षीही शाहिरी जलसा, स्फूर्ती गीतांचे सादरीकरण अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची सांगड घालण्यात येणार आहे.
या उपक्रमांमुळे अण्णाभाऊ साठेंच्या लोकशाहीर परंपरेचा ठसा नव्या पिढीवर उमटवण्याचा प्रयत्न असल्याचे संयोजकांनी सांगितले.