सातारा जिल्ह्यात राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेची जिल्हास्तरीय सहविचार सभा उत्साहात संपन्न

सातारा, दि. १२ जुलै २०२५ | चांगभलं वृत्तसेवा
राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटना, सातारा यांची जिल्हास्तरीय सहविचार सभा आज शनिवार, दि. १२ जुलै रोजी ग्रामविकास भवन, सातारा येथे उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील होते. यावेळी जिल्हाभरातून आलेल्या मोठ्या संख्येतील कर्मचारी बांधवांनी सहभाग नोंदवला.
या बैठकीत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. संघटनेमार्फत समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस आणि संघटित भूमिका घेण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.
नियमित वेतनप्रश्नावर आक्रमक पवित्रा…
जिल्हा परिषद सातारा अंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन २ ते ३ महिने प्रलंबित राहते आहे. याविषयी गंभीर चिंता व्यक्त करत, वेतन नियमित न झाल्यास ऑनलाईन हजेरीवर बहिष्कार आणि रिपोर्टिंग बंद करण्यासंदर्भातील निवेदन मा. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच नवीन रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचेही ठरवण्यात आले.
बदली प्रक्रिया व पदोन्नतीवर भर…
हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांची विनंती बदली समुपदेशन पद्धतीने राबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच एकूण रिक्त पदांपैकी २५% पदे सरळसेवेने भरल्यानंतर उर्वरित ७५% पदांवर पदोन्नती प्रक्रियेसाठी विभागीय स्तरावर पाठपुरावा करण्याचा ठराव घेण्यात आला.
राज्य कार्यकारिणीच्या कामकाजाची माहिती…
यावेळी जिल्हा संघटनेच्या माध्यमातून राज्य कार्यकारिणीने केलेल्या विविध कामकाजाची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.
त्यामध्ये आरोग्य सेवकांचे पदनाम बदलण्याचा पाठपुरावा
वेतन त्रुटी दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न, ऑनलाईन कामकाजासाठी मोबाईल भत्त्याची मागणी, दुसरा व चौथा शनिवार सुट्टीसाठी पाठपुरावा, यांचा समावेश होता.
सभेदरम्यान, कार्य क्षेत्रातील अडचणींवर चर्चा करून त्यावर उपाय शोधण्याची भूमिका स्पष्ट करण्यात आली. तसेच नवीन कर्मचारी बांधवांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
या सहविचार सभेला संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री. गणेश दहिफळे, जिल्हा अध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील, जिल्हा सचिव श्री. श्रीकांत माळवे, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष श्री. रामहरी तांदळे, श्री. सुखदेव वायदंडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. सचिन राठोड, श्री. अमोल गंबरे, श्री. प्रशांत तायडे, श्री. संदीप साळुंखे, संघटक श्री. रोहित भोकरे, श्री. महेश जाधव, श्री. हणमंत बरकडे आदींसह बहुसंख्य कर्मचारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.