सातारा जिल्हा परिषद आणि ११ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना जाहीर; हरकती/सूचना २१ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन

सातारा, दि. १३ | चांगभलं वृत्तसेवा
आगामी २०२५ सालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणांची प्रारूप प्रभागरचना राज्य सरकारच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १२ जून २०२५ आदेशाअन्वये, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभागांच्या भौगोलिक सीमा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार, दि. १४ जुलै २०२५ रोजी सातारा जिल्हा परिषद व ११ पंचायत समित्यांची प्रारूप प्रभागरचना अधिकृतपणे प्रसिध्द करण्यात येत आहे.
ही प्रारूप प्रभागरचना संबंधित तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे सर्वसामान्य नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी काही हरकती अथवा सूचना असल्यास, त्या संबंधित तहसीलदार यांच्याकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सकारण लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी केले आहे.
निर्धारित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती/सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.