सायबर सुरक्षा अभियानाला कराडमधून नवी दिशा! शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सायबर शक्ती’ क्लबची स्थापना

कराड, दि. ११ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
सायबर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर डिजिटल सजगतेसाठी आता कराडमधून नवा पुढाकार घेण्यात आला आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या अभियानांतर्गत ‘सायबर शक्ती’ या नव्या क्लबची स्थापना करण्यात आली.
या क्लबचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये तसेच समाजामध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे हा आहे. त्याअंतर्गत महाविद्यालयात कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच विविध जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती क्लब समन्वयक प्राध्यापिका डॉ. प्रियांका शिंदे यांनी दिली.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजीव वाघ, एम.सी.ए. विभागप्रमुख भागवत पाटील हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. वाघ म्हणाले, “सायबर सुरक्षेबाबतची सजगता ही काळाची गरज असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना वृद्धिंगत होते.“
क्लबच्या कार्यकारिणीमध्ये पुढील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली :
प्रतीक गुंजाळकर – अध्यक्ष
अनुराग वाझरकर – सचिव
प्राजक्ता पवार – गतिविधी संचालक
वैष्णवी निकम – मीडिया संचालक
या उपक्रमामुळे कराड शहरात सायबर सुरक्षेविषयी नव्या स्तरावर जनजागृती होईल, असा विश्वास संबंधितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी क्लब स्थापनेचे प्रमाणपत्र प्राचार्य डॉ. संजीव वाघ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.