गुरूपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांकडून गुरुजनांचा भावनिक सत्कार – आझाद विद्यालय व पुतळामाता कन्या शाळा, कासेगाव येथे कार्यक्रम

कराड, दि. १० जुलै | चांगभलं वृत्तसेवा
कासेगाव (ता. वाळवा) येथील आझाद विद्यालय आणि पुतळामाता कन्या शाळा येथे गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या विशेष दिवशी इयत्ता दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या गुरुजनांचा हृदयपूर्वक सत्कार करून गुरूंच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक एस. एस. पवार, मुख्याध्यापिका एस. एस. पाटील, कार्याध्यक्षा एस. एन. पाटील, आर. पी. पवार, आणि उपकार्याध्यक्ष आर. एस. पांढरबळे यांच्या हस्ते लोकनेते राजारामबापू पाटील व विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान केला. गीत मंचातील विद्यार्थिनींनी “गुरुने दिला ज्ञानरूपी वसा” हे गीत सादर करत वातावरण अधिक भारावून टाकले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्षा एस. एन. पाटील यांनी केले. सहाय्यक शिक्षिका सारिका कांबळे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व आपल्या मनोगतातून विशद केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख एन. पी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दहावीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत नेटके नियोजन केले.
कार्यक्रमास सहाय्यक शिक्षक ए. बी. पाटील, डी. टी. पाटील, पी. टी. पाटील, डी. एल. चौधरी, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन आर्या पाटील व प्रांजली पाटील यांनी केले, तर आभार श्वेता डबाने हिने मानले.