“भारतीय संस्कृती ही गुरुभक्तीची परंपरा जपणारी – जे. बी. माने : ब्रह्मदास विद्यालयात गुरुपौर्णिमा”

कराड, दि. १० जुलै | चांगभलं वृत्तसेवा
कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे दहावीच्या विद्यार्थ्यांच्यावतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी गुरूंच्या सन्मानार्थ विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून गुरूविषयी असलेली कृतज्ञता आणि प्रेमभावना प्रकर्षाने जाणवली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेचे प्रसिद्धी विभाग प्रमुख पी. टी. पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नियोजन, वृत्तांकन आणि प्रसारमाध्यमांपर्यंत बातमी पोहोचविण्याचे काम त्यांनी कुशलतेने पार पाडले. शाळेच्या विविध उपक्रमांचे समाजाशी प्रभावी संवाद साधणारे ते एक महत्त्वाचे दुवे असल्याचे गौरवोद्गार मुख्याध्यापक जे. बी. माने यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जे. बी. माने म्हणाले, “भारतीय संस्कृती ही गुरूंप्रती आदर व भक्तिभाव बाळगणारी आहे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरूंचा सल्ला आणि आशीर्वाद घेणे अत्यावश्यक आहे.”
यावेळी सहशिक्षक एस. डी. वाबळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “आपल्या आयुष्यात ज्येष्ठांप्रती आदर ठेवणे हीच संस्कृती टिकवण्याची पहिली पायरी आहे.”
विद्यार्थिनी मनाली सूर्यवंशी हिने आपल्या भाषणात सांगितले की, “आई-वडील, नातेवाईक आणि शिक्षक हेच आपले खरे गुरु आहेत. त्यांच्या योगदानासाठी सदैव कृतज्ञ राहायला हवे.”
या कार्यक्रमात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार शालोपयोगी वस्तू, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी नववीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छापत्रे देऊन आपले प्रेम व आदर व्यक्त केला. पाचवी ते दहावीच्या वर्गातील सुमारे २० विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंविषयी मनोगते मांडली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रुती मुळीक हिने केले, सूत्रसंचालन वैष्णवी भिंगारदेवे आणि देवयानी मंडले यांनी केले, तर आभार वैदेही काकडे हिने मानले.
कार्यक्रमाच्या वृत्तांकन आणि प्रसिद्धीची जबाबदारी प्रसिद्धी प्रमुख पी. टी. पाटील यांनी पार पाडली.