ग्रामीण संस्कृतीचं कलात्मक दर्शन! वाटेगाव हायस्कूलमध्ये अनोख्या चित्रफलकातून बैलपोळा साजरा

कराड, दि. ९ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
ग्रामीण शेती जीवनाचा आत्मा समजल्या जाणाऱ्या ‘बैल पोळा’ सणाला वाटेगाव (ता. वाळवा, जि. सांगली) येथील वाटेगाव हायस्कूलमध्ये यंदा खास कलात्मक रूप देण्यात आलं. शाळेतील कलाशिक्षक अविनाश कांबळे यांनी खडूच्या साह्याने रेखाटलेल्या अत्यंत आकर्षक आणि आशयपूर्ण चित्रफलकाने या उत्सवाचे विशेष आकर्षण वाढवले.
ग्रामीण संस्कृतीचा भावनात्मक आविष्कार…
बैलपोळा सणानिमित्त साकारण्यात आलेल्या चित्रफलकात साजशृंगार केलेल्या पारंपरिक पोशाखातील बैल, पूजा करणाऱ्या महिलांची आकृती, तसेच वारली शैलीतील ढोल-ताशा वाजवणारे नृत्य कलाकार यांचे सुंदर दर्शन घडवण्यात आले. “इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे…” या मनोहारी वाक्याने ग्रामीण श्रद्धेचा भावनात्मक आविष्कारही या चित्रात दिसून आला.
शेतकऱ्यांच्या ‘दौलती’बद्दल कृतज्ञता…
या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी व त्याची पाळीव जनावरे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शाळेच्यावतीने सर्व शेतकरी बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या. चित्रफलकातील रंगसंगती, पारंपरिकता आणि कलात्मकतेचा मिलाफ विद्यार्थ्यांना ग्रामीण मूल्ये आणि आपली संस्कृतीची अनुभूती मिळवून देणारा ठरला.
मुख्याध्यापक जे. आर. पाटील व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना परंपरांचे महत्त्व सांगत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा सृजनशील उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये गौरवशाली वारशाचा अभिमान निर्माण होतो, असे त्यांनी सांगितले.
बैलपोळ्याचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत..
कला शिक्षक अविनाश कांबळे यांनी “बैलपोळा म्हणजे केवळ पूजन नव्हे, तर तो मेहनती शेतकऱ्यांना वंदन करण्याचा दिवस आहे,” असा संदेश चित्रातून विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवला.