“मतदार याद्यांतील घोटाळे रोखण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर; काँग्रेस सज्ज!”

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा | दि. ७ जुलै २०२५
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारयादीत झालेल्या संशयास्पद फेरबदलांवर आता काँग्रेसने अधिक आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने निवडणूक आयोगाच्या संगनमताने मतदारयादीत मोठ्या प्रमाणात गडबड करून सत्ता मिळवली, असा ठपका काँग्रेसकडून वारंवार लावण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मतदारयादीतील गैरप्रकारांचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
ही समिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशाने गठीत करण्यात आली असून तिच्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील (AICC सचिव), माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभा उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप यांचा समावेश आहे. समन्वयक म्हणून प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संसदेत तसेच प्रसारमाध्यमांतून मतदारयादीतील गोंधळावर गंभीर आवाज उठवला होता.
काँग्रेसने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केली असून, अद्याप समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे ही समिती महाराष्ट्रभरातील परिस्थिती अभ्यासून एक सविस्तर अहवाल तयार करून प्रदेश काँग्रेसकडे सादर करणार आहे.