ब्रह्मदास विद्यालयात दिंडी सोहळा भक्तिभावात साजरा; विद्यार्थ्यांचा पारंपरिक सहभाग लक्षवेधी

कराड प्रतिनिधी, दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा
आषाढी एकादशी निमित्त ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुक येथे पारंपरिक दिंडी सोहळा भक्तिभावात आणि सांस्कृतिक उत्साहात साजरा करण्यात आला.
या सोहळ्याचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक श्रद्धा, पारंपरिक संस्कृतीचे महत्त्व आणि सामाजिक एकात्मतेचे भान निर्माण करणे हा होता.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जयघोषात विठ्ठलनामाचा गजर संपूर्ण गावभर घुमला. पालखी पूजनाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे. बी. माने यांच्या हस्ते झाली. त्यानंतर पालखी गावातील मुख्य रस्त्यांवरून वाजतगाजत काढण्यात आली. अंतिम टप्प्यात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हरिपाठ सादर करून दिंडीची सांगता करण्यात आली.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची वेषभूषा परिधान केली होती. मुलींनी पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून फुगडी खेळत आनंद व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेली भक्तीगीतं, वेशभूषा आणि सहभाग खूपच भावस्पर्शी ठरले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख बी. ए. भोसले, कार्याध्यक्ष बी. डी. पोरे, उपकार्याध्यक्षा वहिदा अत्तार, प्रसिद्धी प्रमुख पी. टी. पाटील, तसेच शिक्षक एस. डी. वाबळे, पी. के. बांबरे, जी. व्ही. रणदिवे, व्ही. एस. कामडी, पल्लवी मोहिते, दिशा कुंभार, मनाली सुर्यवंशी, सचिन पाटील, शिवाजी कोळी यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे व कौशल्याचे कौतुक केले.
दिंडी सोहळा पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव, सांस्कृतिक अभिमान व सामाजिक एकात्मता अधिक दृढ झाली.