विठ्ठलनामाच्या गजरात न्हालं वडी गाव! बालदिंडी आणि रिंगण सोहळ्याने अवघा परिसर विठ्ठलमय 🎉

पुसेसावळी, दि. ६ | चांगभलं वृत्तसेवा
वडी (ता. खटाव) येथील अंगणवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि वडी हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक भक्तिभाव आणि सांस्कृतिक उत्साहाने नटलेला बालदिंडी व रिंगण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.
या उत्सवात सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी ‘बाल वारकरी’ बनून सहभाग नोंदवला. सिद्धनाथ मंदिराच्या प्रांगणात ज्ञानेश्वर माऊलींच्या गजरात आणि संतांच्या जयघोषात रिंगण व दिंडीने अवघा परिसर विठ्ठलमय केला. रिमझिम पावसात ‘माऊली माऊली’च्या जयघोषात विठ्ठल, रखुमाई आणि वारकरी वेशातील बालकांनी उपस्थितांची मनं जिंकली.
श्रीश अतुल अडसुळे याने आकर्षक विठ्ठलाची भूमिका साकारली तर कृष्णा येवले हीने रखुमाईच्या वेशभूषेने लक्ष वेधलं. या कार्यक्रमाला पालक, नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याला सरपंच वैशाली येवले, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ येवले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका स्वाती थोरवे, अडसुळे सर, शिक्षक सूर्यकांत कदम यांच्यासह सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले.