आदिवासींच्या जीवनात प्रकाश टाकणाऱ्या ‘प्रकाश आमटे’ यांना जीवनगौरव पुरस्कार!

कराड प्रतिनिधी, ५ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
सामाजिक कार्यक्षेत्रात जीवनभर झिजून काम करणाऱ्या आणि ‘लोक बिरादरी प्रकल्पा’च्या माध्यमातून आदिवासी जनतेचा आधारवड ठरलेल्या पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (कराड) यांच्यातर्फे २०२५ सालचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
ही माहिती समितीचे संस्थापक निमंत्रक प्रकाश वायदंडे, अध्यक्ष राम दाभाडे, सचिव हरिभाऊ बल्लाळ, कार्याध्यक्ष राहुल वायदंडे, उपाध्यक्ष कृष्णत तुपे, आणि प्रमोद तोडकर, सुरज घोलप, रमेश सातपुते, ॲड. विशाल देशपांडे, गजानन सकट, संजय तडाखे आदींनी दिली.
डॉ. प्रकाश आमटे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींसाठी ‘लोक बिरादरी प्रकल्प’ स्थापन करून तेथे रुग्णालय, शाळा आणि वन्यजीव अनाथालय सुरु केले. या माध्यमातून त्यांनी आरोग्य, शिक्षण व रोजगाराच्या संधी निर्माण करून आदिवासी समाजामध्ये सामाजिक जागृतीचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आदिवासीसेवक पुरस्कार, गॉड फिलीप जीवनगौरव पुरस्कार, पद्मश्री (भारत सरकार), रॅमन मॅगसेसे पुरस्कार, मदर तेरेसा पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
या पुरस्काराचा प्रदान सोहळा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त, २२ ऑगस्ट २०२५ रोजी, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, कराड येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर असतील.