“शिवसेनेचा साताऱ्यात विस्तार सुरू; कराड उत्तरमध्ये पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रवेश”

कराड प्रतिनिधी, दि. ५ | चांगभलं वृत्तसेवा
सातारा जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचा निर्धार शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव यांनी व्यक्त केला आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून अनेक पदाधिकारी, युवा नेते, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
पालकमंत्री शंभूराजे देसाई, संपर्कप्रमुख शरद कणसे, तसेच कराड उत्तरचे शिवसेनेचे युवा नेते पैलवान संतोष वेताळ आबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं.
यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्रसिंह यादव म्हणाले, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवली. त्यामुळे सामान्य माणूस त्यांच्या नेतृत्वाने भारावला असून, साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर लोक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या काळात संपूर्ण साताऱ्यात शिवसेनेचा वटवृक्ष उभा राहील यात शंका नाही.”
यावेळी पैलवान संतोष वेताळ आबा यांनी सांगितले की,
“कराड उत्तर हा लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा बालेकिल्ला ठरेल.”
या कार्यक्रमात महिला आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्षा सुलोचना पवार यांनी सर्व नवप्रवेशितांचे आभार मानले, तर गुलाबराव पवार यांनी प्रास्ताविक केलं.