विद्यार्थ्यांनी अनुभवली भक्ती, शिस्त व एकात्मतेची शाळा; सरस्वती विद्यालयाचा अनोखा उपक्रम | आषाढी २०२५

कराड प्रतिनिधी, दि. ३ जुलै | चांगभलं वृत्तसेवा
“हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा…” या भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात कराड येथील जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यालयाचे दहावीचे विद्यार्थी गोंदवले ते म्हसवड या वारीत उत्साहाने सहभागी झाले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सरस्वती विद्यालयाने यंदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वारीचा अनुभव देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला. १ जुलै २०२५ रोजी ज्ञानोबा-तुकारामाच्या गजरात विद्यार्थ्यांचा टाळ-मृदुंगासह दिंडी निघाली आणि गोंदवले गावातून वारीला सुरुवात झाली.
मुख्याध्यापिका सौ. सोनाली जोशी व समन्वयक विजय कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमात इयत्ता दहावीचे ४६ विद्यार्थी व ५ शिक्षकांनी सहभाग नोंदवला. गोंदवलेकर महाराज संस्थान आयोजित वारीचा पहिला टप्पा—सुमारे २२ कि.मी. अंतर विद्यार्थ्यांनी चालत पार केला.
वारी दरम्यान विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांसोबत टाळ, मृदुंग, तुळशी वृंदावन घेऊन गोल रिंगणात सहभाग घेतला. वारीतील भोजन व्यवस्था, खाऊवाटप, निवास व्यवस्था, सामूहिकतेची भावना आदींचा अनुभव घेत त्यांनी वारकरी संप्रदायाचा भक्तीभाव जवळून पाहिला. शाळेबाह्य शिक्षणाची ही एक समृद्ध अनुभूती विद्यार्थ्यांसाठी जीवनदृष्टी देणारी ठरली
शिक्षक दीपक पाटील, गौरी जाधव, प्रतिभा चव्हाण, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रुपाली तोडकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सोनाली जोशी व सेवक संतोष पारवे यांनी विद्यार्थ्यांसोबत वारीत सहभाग घेतला.
“हीच खरी परंपरेची शिकवण”…
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अनिल कुलकर्णी, विश्वस्त नितीन गिजरे, सुनील मुंद्रावळे हे देखील विद्यार्थ्यांसमवेत वारीत सहभागी झाले. विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांनी खाऊवाटप केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. शिरीष गोडबोले यांनी उपक्रमासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
वारकऱ्यांनी देखील विद्यार्थ्यांच्या या सहभागाचे मन:पूर्वक कौतुक करत, “हीच खरी परंपरेची शिकवण” असल्याचे मत व्यक्त केले.