राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त वाटेगांव हायस्कूलमध्ये चित्ररूप अभिवादन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

कासेगाव, दि. २६ जून | चांगभलं वृत्तसेवा
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वाटेगाव (ता. वाळवा) येथील वाटेगांव हायस्कूलमध्ये बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात त्यांना चित्ररूप अभिवादन करण्यात आले.
शाळेतील कलाशिक्षक अविनाश कांबळे सर यांनी शाहू महाराजांचे तेजस्वी व दयाळू व्यक्तिमत्त्व रंगीत खडूच्या साहाय्याने विद्यालयाच्या दर्शनी फलकावर अत्यंत आकर्षक पद्धतीने रेखाटले. हे चित्र पाहून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनीही त्याचे कौतुक केले.
कार्यक्रमात शाळेच्या आवारात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व ग्रामस्थांनी अभिवादन केले. यावेळी शाहू महाराजांचे समाजसुधारणेतील योगदान, शिक्षणवाढीसाठी केलेले कार्य आणि सामाजिक समतेचा संदेश यावर मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्याध्यापक पाटील सर यांनी यावेळी बोलताना सांगितले, “राजर्षी शाहू महाराज हे केवळ एका काळाचे नेतृत्व नव्हते, तर आजच्या पिढीसाठीही ते एक प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दिलेल्या समतेच्या आणि शिक्षणाच्या मूल्यांचा आदर्श विद्यार्थी जीवनात पाळावा, हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.”
विद्यार्थ्यांमध्ये शाहू महाराजांबद्दल अभिमान निर्माण व्हावा, त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी, या उद्देशाने कार्यक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांनीही विशेष कौतुक केले.