कराडला सायबर विभाग, निर्भया कक्ष आणि CCTV कंट्रोल रूम – एकाच छताखाली!
उपविभागीय कार्यालयात अत्याधुनिक सभागृहाचं लोकार्पण

कराड प्रतिनिधी (24 जून) | चांगभलं वृत्तसेवा
कराड विभागातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम, आधुनिक आणि प्रशिक्षणक्षम होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कराड येथे सुसज्ज सभागृह व नव्या विकसन सुविधांचे उद्घाटन मंगळवार, दि. २४ जून रोजी करण्यात आले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते आणि अप्पर पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडुकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला.
सभागृहाची संकल्पना उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सादर केली होती. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने या प्रकल्पाला मूर्त स्वरूप दिलं.
✅ सभागृहाचा उद्देश आणि उपयोग:
सुमारे २०० आसन क्षमतेच्या या आधुनिक सभागृहाचा उपयोग प्रामुख्याने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि पोलीस पाटील यांना प्रशिक्षण, कायद्याचे सखोल मार्गदर्शन आणि तपास कौशल्यवृद्धी यासाठी केला जाणार आहे. पोलीस यंत्रणेच्या व्यावसायिक कार्यक्षमतेत भर घालणारे हे पाऊल ठरणार आहे.
🏢 विकसन प्रकल्पात समाविष्ट विशेष सुविधा :
१) सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईसाठी स्वतंत्र सायबर विभाग, उपविभागीय पातळीवर आता सक्रीय होणार.
२) निर्भया पथकासाठी स्वतंत्र कक्ष, ज्यामध्ये महिलांच्या तक्रारी अत्यंत गोपनीयतेने आणि प्रभावीपणे हाताळल्या जातील.
३) CCTV कंट्रोल रूम, जी कराड शहरासह इतर पोलीस ठाण्यांमधील महत्त्वाच्या ठिकाणांवरील कॅमेऱ्यांचे नियंत्रण ठेवेल.
👥 उपस्थित मान्यवर:
या उद्घाटन सोहळ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, किरण भोसले, आदिनाथ खरात, रविंद्र भोरे, संदीप सूर्यवंशी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अक्षय देसाई आणि इतर अधिकारी, पोलीस जवान उपस्थित होते.
या प्रकल्पामुळे केवळ भौतिक सुविधा उभारण्यात आलेल्या नाहीत, तर पोलीस यंत्रणेची गुणवत्ता, सुरक्षितता आणि जनतेशी नातं अधिक दृढ होणार आहे.