सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला काळा रानकुत्रा! देशात ८८ वर्षांनंतर दुर्मीळ प्रजातीची नोंद – changbhalanews
निसर्गायन

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला काळा रानकुत्रा! देशात ८८ वर्षांनंतर दुर्मीळ प्रजातीची नोंद

कराड, दि. 23 | चांगभलं वृत्तसेवा

जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एक दुर्मीळ घटना नुकतीच समोर आली आहे. या व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील एका गावात फिरण्यासाठी गेलेल्या कराड येथील पर्यटक दिग्विजय पाटील यांना काळा रानकुत्रा (मेलेनिस्टिक) दिसून आला. त्यांनी तो क्षण मोबाईलमध्ये कैद केला आणि या दुर्मीळ घटनेबाबतची माहिती त्वरित मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली.

विशेष म्हणजे, याआधी अशा प्रकारची काळ्या रानकुत्र्याची नोंद १९३६ मध्ये तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील गड्डेसल या ठिकाणी झाली होती. त्या वेळी शिकारी, निसर्गशास्त्रज्ञ, कॉफी प्लांटर आणि स्कॉट्समन आर.सी. मॉरिस यांनी हा प्राणी प्रथम नोंदवला होता. आता ८८ वर्षांनंतर अशा प्रकारचा रानकुत्रा पुन्हा एकदा दिसून आल्याने वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

रानकुत्रा, ज्याला कोळशिंदा असेही म्हणतात, याचे शास्त्रीय नाव कुओन अल्पिनुस आहे. हा प्राणी सहसा तांबूस-लालसर रंगाचा असतो. मात्र, काही ठराविक वेळेस मेलेनिन या रंगद्रव्याचे असामान्य प्रमाण असल्यामुळे तो संपूर्ण काळ्या रंगाचा दिसतो. यालाच मेलेनिस्टिक अवस्थेतला रानकुत्रा असे संबोधले जाते.

या प्राण्याचे शरीर ४३ ते ४५ सें.मी. उंचीचे तर लांबी सुमारे ३ फूटपर्यंत असते. नराचे वजन २० किलोच्या आसपास असते, तर मादीचे वजन नरापेक्षा थोडे कमी. कळपाने राहणाऱ्या या प्रजातीचे वास्तव्य जंगलांमध्ये आढळते आणि हे प्राणी सामूहिक शिकारीसाठी ओळखले जातात. हरीण हे त्यांचे आवडते खाद्य असून कधी कधी गवा सारख्या मोठ्या प्राण्यांचीही शिकार ही कळपाच्या सहाय्याने करतात.

येथे व्हिडिओ पहा 👇

विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी यासंदर्भात त्वरित प्रतिक्रिया देत सांगितले की, “सदर परिसरात कॅमेरे बसवण्याच्या सूचना वनरक्षकांना देण्यात आल्या असून या दुर्मीळ घटनेचा अधिक अभ्यास केला जाणार आहे.”

🗣️ मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे म्हणतात की :

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात यापूर्वी काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. आता काळा रानकुत्रा दिसल्याने जैवविविधतेच्या बाबतीत ही एक मोठी घटना मानली पाहिजे. दिग्विजय पाटील यांनी वेळेवर माहिती दिली, यामुळे नोंदी व पुढील संशोधनास हातभार लागणार आहे.

📚 वैज्ञानिक माहिती – मेलेनिस्टिक म्हणजे काय..?

जीवशास्त्रात मेलेनिस्टिक म्हणजे अशी स्थिती, जिथे एखाद्या प्राण्यामध्ये मेलेनिन या रंगद्रव्याचे प्रमाण अत्यधिक जास्त असते. त्यामुळे त्या प्राण्याचा रंग सामान्यापेक्षा काळसर अथवा गडद होतो. हे अनुवांशिक वैशिष्ट्य प्रामुख्याने सस्तन प्राणी, पक्षी व सरपटणारे प्राणी यामध्ये दिसून येते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ही नोंद या क्षेत्रातील समृद्ध जैवविविधतेचे प्रतीक आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close