ब्रह्मदास विद्यालयाची सृष्टी मोहिते ही ‘एनएमएमएस’मध्ये राज्यात बारावी
कासेगाव शिक्षण संस्थेत प्रथम ; विद्यालयास बहुमान ; एस. वाय. माने

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
“मेहनत, जिद्द आणि योग्य दिशेने केलेला अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी मेहनतीने हे सिद्ध करून दाखवले आहे, गतवर्षी एसएससी परीक्षा मध्ये संचीता साळुंखे हिने कासेगाव शिक्षण संस्थेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला होता, हीच परंपरा सृष्टी मोहिते हिने एन एम एम एस परीक्षेत यश मिळवून कायम ठेवली .” असे गौरवोद्गार ब्रह्मदास विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. वाय. माने यांनी स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना काढले.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या ब्रह्मदास विद्यालय, बेलवडे बुद्रुकच्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस आणि सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विलक्षण यश मिळविले. भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या अंतर्गत घेतली जाणारी एन एम एम एस परीक्षा ही देशभरातील गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. पात्र विद्यार्थ्यांना पाच वर्षांसाठी दरवर्षी रु. १२,००० शिष्यवृत्ती दिली जाते.
या परीक्षेत ब्रह्मदास विद्यालयाच्या सृष्टी शरद मोहिते हिने १४३ गुण मिळवत गुणवत्ता यादीत राज्यात १२ वे स्थान पटकावले, तर भाग्यश्री पवार हिने विशेष मागास प्रवर्गात ९४ गुण मिळवत राज्यात ४ थे स्थान मिळवून विद्यालयाचा सन्मान वाढवला.
सारथी शिष्यवृत्ती परीक्षेतही नेत्रदीपक कामगिरी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत देखील विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळवले. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी रु. ९,६०० च्या प्रमाणे चार वर्षे शिष्यवृत्ती दिली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अनुजा सुशांत मोहिते, समर्थ हणमंत थोरात आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यावेळी कार्याध्यक्ष जे. बी. माने म्हणाले, “ यशस्वी विद्यार्थ्यांनी मागील वर्षाची परंपरा कायम ठेवत एन एम एम एस व सारथी परीक्षेत अभूतपूर्व यश मिळवले .
या यशामुळे ब्रह्मदास विद्यालयाचे नाव पुन्हा एकदा शैक्षणिक क्षेत्रात झळकले आहे . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक एस. वाय. माने, जी. व्ही. रणदिवे, एन. के. माळी, व्ही. पी. मोटे, जी. ए. मोरे, एस. डी. वाबळे यांचा मोठा वाटा आहे.
या यशाबद्दल कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव आर. डी. सावंत, अधीक्षक ए. डी. पाटील, उपअधीक्षक एस. एल. माने, परीक्षा विभाग प्रमुख एस. एम. पवार, पर्यवेक्षक बी. जी. शिंदे, कार्याध्यक्ष जे. बी. माने, उपकार्याध्यक्षा सुवर्णा जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख पी. टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.