महिलांच्या प्रगतीसाठी भाजपा-महायुतीचे सरकार कटीबद्ध : आ. चित्रा वाघ
कराड येथे भाजपा महिला मोर्चाच्यावतीने हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला कल्याणाला प्रथम प्राधान्य देत, अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्याचधर्तीवर विविध योजना राबवून महाराष्ट्रातही मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा–महायुतीचे सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ.सौ. चित्रा वाघ यांनी केले. कराड दक्षिण भाजपा महिला मोर्चाच्यावतीने आयोजित हळदी-कुंकू समारंभात त्या बोलत होते.
कराड येथे आगमन झाल्यानंतर आ.सौ. वाघ यांचे कृष्णा महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांनी स्वागत केले. यानंतर हळदी-कुंकू सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना आ.सौ. वाघ म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती झाली पाहिजे, हे पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे धोरण आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, यासाठी बचत गटांना मोदी सरकारने हजारो कोटींचा निधी दिला आहे. याशिवाय लखपती दीदी योजनेच्या माध्यमातूनही महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहेत. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत, सरकारने ११२ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. काही अनुचित घटना घडत असल्याचे दिसून आल्यास या क्रमांकावर संपर्क केल्यास तत्काळ मदत मिळेल.
राज्यातील भाजपा-महायुतीचे सरकारही महिलांच्या प्रगतीसाठी कटीबद्ध असून, लाडकी बहिण योजना, एस.टी. भाड्यात ५० टक्के सवलत अशा योजनांच्या माध्यमातून महिला वर्गाला मोठा लाभ मिळवून दिला आहे. महिलांनी मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी व्हावे. आपल्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यासाठी आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या रुपाने तुमचा हक्काचा भाऊ इथं आहे. त्यांच्या पाठीशी सर्वांनी सदैव उभे राहावे, असे आवाहन आ.सौ. वाघ यांनी केले.
यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा पदाधिकारी डॉ. सारिका गावडे, माजी जि. प. सदस्या सौ. श्यामबाला घोडके, माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, माजी नगरसेविका नूरजहाँ मुल्ला, सौ. सच्चना माळी, कविता माने यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.