हाताला साथ देऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा – सुषमा अंधारे यांचे आवाहन – changbhalanews
राजकिय

हाताला साथ देऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा – सुषमा अंधारे यांचे आवाहन

आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ कराडला झाला महिला मेळावा

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कमळ हे दलदलीत उगवत असते, मात्र कराडचा भाग सखल आहे. इथे कमळ कधीच उगवलेले नाही. आपल्या हितासाठी आपल्याला कराडची संस्कृती हलवू द्यायची नाही. हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे राज्याचे सोज्वळ नेतृत्व कराड दक्षिणेच्या जनतेने जपावे, असे आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

कराड तालुका महाविकास आघाडीच्या भव्य महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. आ. पृथ्वीराज चव्हाण, सौ. सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण, कर्नाटकचे माजी मंत्री विनयकुमार सोरके, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, प्रा. धनाजी काटकर, कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, अर्चना पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अल्पना यादव, तालुकाध्यक्षा विद्याताई थोरवडे, गीतांजली थोरात, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, रेठरे बुद्रुकच्या अर्चना अविनाश मोहिते यांच्यासह महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

त्या म्हणाल्या, एकीकडे महाविकास आघाडी तुमच्या – आमच्या विकासावर बोलत असताना दुसरीकडे मात्र महायुतीचे नेते मतदारांना धमकावत आहेत. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी तर महिलांनाच धमकी दिली. याचा नीट विचार करायची वेळ आली आहे. महाडिक किंवा भाजपच्या नेत्यांनी बापजाद्यांची जमीन विकून महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे दिले आहेत का? महायुती महिलांना मतांचे आमिष दाखवण्यासाठी योजना राबवत आहेत का? असा सवाल आमदार यांनी उपस्थित केला.

आपल्या बहिणीच्या लग्नात आपण खर्च केला म्हणून कधी पोस्टर लावतो का? आपल्या भावांनी असे कधी केले का? कारण तेथे त्यांना बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते. बहिणीच्या गरीबीची टिंगल त्यांनी कधी केली नाही. आमचा भाऊ पोस्टर लावत नाही. पण महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या १५०० रुपयांसाठी लाखो रुपयांचे पोस्टर लावले, अशी टीका अंधारे यांनी केली.

महिलांचा अपमान करण्याची परंपरा फडणवीस यांनी घालून दिल्याचा आरोप करत सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, फडणवीस यांची नजर कराडवर असून कराडला गिळण्यासाठी त्यांनी एक कळसूत्री बाहुली उभी केली आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लाडकी बहिण योजनेचे विधानसभेतील भाषणात मी स्वतः स्वागतच केले होते. पण त्यामध्ये काही बदलही सुचविले आणि त्यानुसार सरकारने बदल केले. त्याचा राज्यातील जनतेला फायदा झालाच. कर्नाटकातील आमच्या काँग्रेसच्या सरकारने ही योजना आधीच सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारला लोकसभेतील पराभवानंतरच लाडकी बहिण योजना आठवली.

विनयकुमार सोरके, शारदा जाधव, अर्चना मोहिते, वैशाली जाधव यांची भाषणे झाली. विद्याताई थोरवडे यांनी प्रास्ताविक केले. गीतांजली थोरात यांनी आभार मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close