तांब्याचा विष्णूबाळा फेम अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
तांब्याचा विष्णू बाळा, बापू बिरू वाटेगावकर अशा नामांकित गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका केलेले आणि वृक्ष संवर्धन चळवळीसाठी योगदान देणारे साताऱ्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेत राजकारणात पक्ष प्रवेश केला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, चित्रपटसृष्टीसह सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील सयाजी शिंदे यांचे योगदान अनमोल आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नवं बळ मिळणार आहे. तसेच जनसेवेत त्यांचा मोलाचा हातभार लागेल, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यांना पुढील राजकीय प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!