राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कराड जिल्ह्यात अव्वल, २२०६ प्रकरणांचा निपटारा – न्या. यु. एल. जोशी – changbhalanews
Uncategorized

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कराड जिल्ह्यात अव्वल, २२०६ प्रकरणांचा निपटारा – न्या. यु. एल. जोशी

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ना. सर्वोच्च न्यायालय व ना. मुंबई उच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४-२५ या वर्षातील तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये कराड न्यायालयाने बाजी मारली असून सर्वाधिक दावे आणि खटल्यांचा निपटारा तसेच सामंजस्याने वादविवाद मिटवण्यात जिल्ह्यात पुन्हा एकदा प्रथम क्रमांक पटकावला असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश न्या. यु. एल. जोशी यांनी दिली. राष्ट्रीय लोक अदालतीतील अभूतपूर्व यशाबद्दल सहयोगी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा न्यायाधीश दिलीप भा पतंगे, न्या. सतीश कुर्हेकर, न्या. पी. एल‌ घुले, न्या. सुधीर बोमिडवार, न्या. ऐ. झेड. सय्यद, न्या. पी एस भोसले, न्या ए. व्ही.मोहिते, न्या एम. बी. भागवत, न्या पी. जी. शेलार यांच्यासह प्रमुख कार्यालयीन अधीक्षक दीप्ती सामक यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्या यु. एल. जोशी म्हणाल्या, लोकांचा वेळ, श्रम आणि पैसा वाचावा, पक्षकारांना मानसिक स्वास्थ्य लाभावे आणि सामंजस्याने त्यांच्यातील वाद मिटावे याकरिता देशपातळीवर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. कराड तालुक्यातील जनता सुज्ञ असून त्यांनी नेहमीच लोक न्यायालयाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. कराड न्यायालयात एकूण १८ हजार ४९८ प्रकरणे प्रलंबित असून त्यापैकी ३२१३ प्रकरणे लोकन्यालयात ठेवण्यात आली होती, यापैकी तब्बल ५६४ प्रकरणे या लोकन्यायालयात सामंजस्याने मिटवण्यात आली या माध्यमातून एकूण तीन कोटी ४८ लाख २९ हजार ८८४ रुपयांची वसुली करण्यात आली. तसेच दाखल पूर्व प्रकरणांमध्ये 9032 प्रकरणे लोक आदालत मध्ये समाविष्ट करण्यात आला होता यापैकी १६४२ प्रकरणांचा प्रकरणांचा या लोक अदालत मध्ये निपटारा करण्यात आला या माध्यमातून जवळपास न्यायालयात प्रकरणे दाखल न होताच ८७ लाख ७३ हजार ७९० रुपयांची तडजोडी लोक अदालत च्या माध्यमातून झाली. एकंदरीत एकूण १८४९८ प्रकरणांपैकी १२२४५ प्रकरणे लोक अदालत मध्ये समाविष्ट करण्यात आली होती यामध्ये २२०६ प्रकरणांचा या लोक अदालत मध्ये निपटारा करण्यात आला तर तब्बल चार कोटी छत्तीस लाख ३ हजार ६७४ रुपयांच्या तडजोडी सामंजस्याने झाल्या.

न्या दिलीप भा पतंगे म्हणाले, कराड उपविभागातील कराड शहर, कराड तालुका, उंब्रज, तळबीड आणि मसूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे लोकअदालत यशस्वी होण्यास त्यांचा सहभाग लाभला, तसेच वाहतूक शाखा, बँका, पतसंस्था आणि ग्रामपंचायती यांनी देखील हिरीरीने लोक न्यायालयात सहभाग घेतला. एकंदरीत सामूहिक कामगिरीच्या जोरावर हे लोक न्यायालय यशस्वीरित्या संपन्न झाले.
यावेळी न्यायालयीन अधीक्षक शेखर शेलार, सुधीर लांडगे, रवींद्र कुलकर्णी, केंगार यांच्यासह विधी सेवा समितीचे राजेंद्र भोपते आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

सत्कार रुपी रोपटे…!

कराड लोक अदालतीच्या घवघवीत यशाबद्दल जिल्हा न्यायाधीश जोशी यांनी सहयोगी अधिकारी आणि कर्मचारी यांना रोपटे देऊन सन्मानित केले, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या चरणाची यावेळी उपस्थितांना अनुभूती आली.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close