कासारशिरंबेच्या प्रेरणा सावंत यांची पोलीस दलात निवड
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कासारशिरंबे ता. कराड गावची सुकन्या प्रेरणा शंकर सावंत यांची पुणे पोलीस दलात महिला पोलीस पदावर निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्रेरणा यांचा विविध मान्यवरांसह ग्रामस्थांनी सत्कार केला. ‘शालेय जीवनापासून आपल्याला पोलीस दलाचे आकर्षण होते, त्यामुळे पोलीस दलात भरती होण्याचे ध्येय ठरवून त्यासाठी अथक प्रयत्न केला, त्याला यश आले’, असे प्रेरणा सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.
प्रेरणा यांचे प्राथमिक शिक्षण कासारशिरंबे येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण बेलवडे बुद्रुक येथील ब्रह्मदास विद्यालयात झाले आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण वाई येथील किसनवीर महाविद्यालयात झाले आहे. पाचवड (वाई) येथील शहिद भगतसिंग करिअर अकॅडमी मध्ये प्रा. सुशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भरतीपूर्व प्रशिक्षण घेतले. प्रेरणा यांना दोन बहिणी व एक भाऊ आहे, आई जयश्री या गृहिणी तर वडील शंकर रामचंद्र सावंत हे शेती करतात.
शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या कुटूंबातील मुलगी तिच्या जिद्दीने पोलीस झाल्याचा मोठा आनंद ग्रामस्थांना आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी तिची मिरवणूक काढून गावात सत्कार केला. सरपंच उमेश महाजन, पोलीस पाटील उदय पावणे, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संभाजी कळसे, जीवन मोहिरे, माजी सरपंच बाबूराव यादव आदींनी प्रेरणा यांचा सत्कार केला. या निवडीबद्दल एल आय सी चे चेअरमन क्लब मेंबर , विमा सल्लागार विनोद मोहिते, विक्रमसिंह मोहिते, पत्रकार हैबतराव आडके यांनी प्रेरणा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.