चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
ना. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली कराड न्यायालयातील न्यायाधीशांनी संपूर्ण कोर्ट परिसर स्वच्छ केला. कराड जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश यु. एल जोशी यांच्या नेतृत्वाखाली कराड न्यायालयातील सर्व न्यायाधीशांनी एकत्रित येत महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबवली.
आयुष्यभर स्वच्छतेचे व्रत जोपासलेल्या दिवंगत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘स्वच्छता ही सेवा’ या ब्रीदवाक्यखाली स्वच्छता मोहीम राबवली जाते. कराड न्यायालयात सर्व न्यायाधीश त्यांच्या अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्यासह एकत्रित आले यावेळी कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड एम टी देसाई यांनी देखील त्यांच्या सहकाऱ्यांसह या मोहिमेत सहभाग नोंदवला. जिल्हा न्यायाधीश यु. एल.जोशी यांनी सांगितले की कराड न्यायालयात स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य देण्यात आले आहे, स्वच्छता मोहीम पंधरवड्यात आम्ही सर्वजण सहभाग घेणार असून तीन ग्रुपमध्ये विभागणी केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येकाला कामाचे स्वरूप वाटून देण्यात आले आहे. स्वच्छतेमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, कराड न्यायालयातील सर्व परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे.
यावेळी सहकारी न्यायाधीश एस. बी. तोडकर, न्या. सतीश कुर्हेकर, न्या. पी. एल. घुले, न्या. सुधीर बोमीडवार, न्न्या. पी.एस. भोसले, न्या. ए. वि. मोहिते, न्या. एम. व्ही. भागवत, न्या. पी. जी. शेलार यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक दीप्ती सामंत, शेखर शेलार, सुधीर लांडगे, रवींद्र कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.