युनेस्कोकडून नामांकनासाठी निवड झालेल्या प्रतापगडावर सह्याद्री प्रतिष्ठान रविवारी राबविणार स्वच्छता मोहिम ; जनजागृतीसाठी संपूर्ण जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिम
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या त्याग, बलिदान व पराक्रमाचे जिवंत स्मारक असणार्या 12 गडकोटांची युनेस्कोकडून नामांकनासाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व गडकोटांची पाहणी 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून यामध्ये सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले प्रतापगडचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानकडून रविवार, 22 सप्टेंबरला प्रतापगड स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील शिवभक्तांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगड, दुसरी राजधानी किल्ले रायगडसह प्रतापगड व अन्य 9 किल्ल्यांची युनेस्कोकडून पाहणी करून आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी युनेस्कोचे एक विशेष पथक 27 सप्टेंबरला दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर या किल्ल्यांसह राज्यातील अन्य गडकोटांच्या जतन व संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानकडून जिल्ह्यातील सर्व दुर्ग संवर्धन संस्थांसह शिवभक्तांना रविवारी होणार्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात गडकोटांचे महत्त्व अनन्यसाधारण असे होते. हेच गडकोट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह लाखो मावळ्यांच्या त्याग, बलिदान व पराक्रमाचे प्रतिक आहे. त्यामुळे या गडकोटांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करणे आवश्यक आहे. गडकोटांचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून आज राज्यात सह्याद्री प्रतिष्ठानसह अनेक दुर्ग संवर्धन संस्था कार्यरत आहेत. गडकोटांचे पावित्र्य कायम रहावे यासाठी या सर्व दुर्ग संस्था अहोरात्र मेहनत घेत असून या शिवकार्यास हातभार लावणे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्यच आहे. त्यामुळेच रविवारी होणार्या स्वच्छता मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात स्वाक्षरी मोहिम…
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून सातारा जिल्ह्यातील कराड, सातारा, कोरेगाव, खटाव, माण, पाटण, वाई, खंडाळा, जावळी यासह प्रत्येक तालुक्यात सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांकडून स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे किल्ले प्रतापगडासह जिल्ह्यातील सर्व गडकोटांच्या जतन व संवर्धनासाठी जनजागृती केली जात आहे. तसेच रविवारी होणार्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन शिवभक्तांसह युवा पिढीला केले जात आहे.