चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा जिल्हयामध्ये गुन्हेगार व त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सक्त सुचना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यातून तडीपार असतानाही कराड परिसरात वावरत असलेल्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयित नामचीन गुंडाला कराड पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकाने सापळा रचून पकडले. त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की पोलीस अभिलेखावरील व सध्या हददपार असलेला कुख्यात संशयित सनी सुरेश शिंदे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा हा ओगलेवाडी, कराड परिसरात तडीपार असतानाही वावरत आहे. त्याचे खात्री करून पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकाने मौजे ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा येथे सापळा रचून संशयित सनी शिंदे ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित सनी शिंदे हा अमित कदम टोळीचा सदस्य… टोळीवर गंभीर गुन्हे…
पोलिसांनी ताब्यात घेतलेला सनी सुरेश शिंदे वय २५ हा कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावचा रहिवासी आहे. तो पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड असुन, तो अमित कदम त्याच्या टोळीचा सदस्य आहे. या टोळीवर कराड शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर अग्निशस्त्राचे व अवैध दारु विक्रीचे व्यक्तीगत व टोळीने गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीचा प्रमुख १) अमित हणमंत कदम वय २७ वर्षे होली फॅमिलीचे मागे, वैभव कॉलनी विद्यानगर सैदापुर कराड, हा असून टोळीचे सदस्य २) सनी सुरेश शिंदे वय २५ वर्षे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा ३) वाहिद बाबासो मुल्ला वय २६ वर्षे रा.विंग ता. कराड जि. सातारा ४) रिजवान रज्जाक नदाफ वय २४ वर्षे रा. मलकापुर ता. कराड हे आहेत. पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडील हददपार आदेशाने १ ऑगस्ट २०२४ रोजी संपूर्ण सातारा तसेच सांगली जिल्हयातील वाळवा, शिराळा व कडेगाव तालुक्यातुन संशयित सनी शिंदे याला २ वर्षाकरीता पोलिसांनी तडीपार केले होते. मात्र तरीही या देशाचे उल्लंघन करून तो ओगलेवाडी परिसरात वावरत होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
पोलीस अधीक्षकांकडून टीमचे अभिनंदन…
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांच्या पथकाने केली. सदर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी कराडचे उपाधीक्षक अमोल ठाकूर व पथकातील अधिकारी, पोलीस कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.