जुन्या काळात कोयना दूध संघाची निर्मिती ‘अशी’ झाली…! लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी संघाचा विस्तार असा केला…
चांगभलं ऑनलाइन |
राज्यात सहकारी तत्तावर सर्वात प्रथम स्थापन झालेल्या कोयना दूध संघाचे प्रेरणास्त्रोत्र असलेल्या लोकनेते स्व. विलासकाका पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा आज अनावरण सोहळा संपन्न होत आहे. खोडशी (ता. कराड) येथील कोयना दूध संघाच्या प्रांगणात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा संपन्न होत आहे, त्यानिमित्त….
कराड व इतर शहरांना गुणवत्तापूर्ण दूधाचा पुरवठा करता यावा या उद्देशाने सहकारमहर्षी कै. आर. डी. पाटील यांनी दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरविले. प्रथमत: सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या कराड शाखेतील शिपायाच्या मदतीने व्यवसाय करण्याचे ठरले. भिलवडीतून सकाळी 12:30 ते 1:00 वाजेपर्यंत दूध रेल्वेने कराडला यायचे आणि त्यानंतर त्याचे ग्राहकांपर्यंत वाटप व्हायचे. मात्र दूध हा नाशवंत पदार्थ असल्याने लवकरच अडचणी समोर येऊ लागल्या. रेल्वे उशिरा आली किंवा वाटप वेळेत झाले नाही तर दूध नासू लागले. दूधाचा दर्जा असताना देखील हा प्रयत्न रूपाला आला नाही.
अशा प्रकारे व्यवसाय करता येणार नाही हे जाणून त्यांनी डेअरी उभारण्याचे ठरविले. तज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात आला. त्या आराखड्याप्रमाणे प्रकल्पासाठी सुमारे दीड लाखांचा खर्च येणार होता. काम गरूडाच होत आणि झेप चिमणीची. यावर मार्ग निघत नव्हता. मात्र राज्य सरकारकडून दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सातारा आणि अहमदनगर या दोन जिह्यांना प्रायोगिक प्रकल्प देण्यात आले.
या योजनेनुसार दुधासाठी कॅन्स, वाहतुकीसाठी वाहने, तपासणी साहित्य, बाटल्या भरण्याची यंत्रसामुग्री याकरिता निधी मिळणार होता. शासकीय अधिकारी श्री. राहुरकरांनी या योजनेबाबत जिह्यात बऱ्याच जणांना कल्पना दिली. अगदी भिलारे गुरूजी पर्यंत. मात्र कोणीच तयार होईना. शेवटी आर. डी. पाटील यांनी पुढाकार घेत हे शिवधन्युष्य पेलण्याचे ठरविले. कराड तालुका दूध उत्पादक सहकारी संघ या प्रवर्तित संस्थेचे प्रकरण तयार होऊन नोंदणीसाठी पाठविण्यात आले. 1957 साली नोंदणी झालेल्या या संस्थेच्या कामकाजाला 1958 साली सुरूवात झाली. डेअरी योजनेचा उद्घाटन समारंभ जून 1959 साली यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. कच्चे दूध गोळा करण्यासाठी वहागाव, आबईचीवाडी, कोपर्डे, वाठार, कापील याठिकाणी सहकारी संस्था निर्माण करण्यात आल्या. या संस्थांच्या कामकाजासाठी सरकारी अनुदान लाभले आणि त्यामुळे या संस्था तोट्यात गेल्या नाहीत. सकाळी दूध आणून ते 11 ते 1 वाजेपर्यंत शहरात वाटायचे या प्रकारे हे काम 1960 पर्यंत चालले खरे. पण दूध नासण्याचे प्रकार वारंवार घडत.
सन 1962 या काळात दूधाचे कॅन पाण्याच्या भांड्यात ठेवून स्टीमद्वारे गरम करावयाचे व नंतर कॅन बर्फात ठेवून ते थंड करायचे हा प्रयोग यशस्वी झाला. परंतु या कालावधीत संघाला 54,000 तोटाच झाला. आर. डी. पाटील साहेबांनी बाळासाहेब देसाई, यशवंतराव चव्हाण यांच्याशी वारंवार चर्चा करून शासनाने आमचे दूध घेतले पाहिजे ही गळ घातली. होकार आल्याशिवाय थांबतील ते आर. डी. कसले. बाळासाहेब देसाई यांनी ट्रक उपलब्ध करून दिला आणि दूध पुण्याला जायला लागले. शहरातच दूध निर्माण करून ते शहरातच विकले गेले पाहिजे असा त्यावेळचा मतप्रवाह होता अधिकाऱ्याचा, मात्र बाळासाहेबांनी हा धाडसी निर्णय घेतला. डेअरीसाठी जागा शोधण्याचे काम सुरू झाले. तत्कालीन जिल्हाधिकारी देशमुख यांचे मदतीने खोडशी ग्रामपंचायतीची 10 एकर व खासगी 6 एकर अशी 16 एकर जागा उपलब्ध झाली. प्रकल्पाकरिता परवानगीपूर्वीच खोडशी धरणातून पाणी उपलब्ध केले गेले. शंकरराव चव्हाण यांनी प्रकल्पाचे महत्व ओळखून जिराईत शेतीला पूरक व्यवसायाला पाणी मंजुरी देण्यास संमती दिली. दुर्दैवाने 19 जून 1976 रोजी आर. डी. साहेबांचे अपघाती निधन झाले. आर. डी. साहेबांच्या पश्चात कापिलचे भाऊसाहेब धुराजी जाधव यांनी संघाची धुरा वाहिली. मात्र सक्षम नेतृत्वाची उणिव भासत होती. याच काळात काकांचे उमदे नेतृत्व जिह्यात पुढे आले होते.
तेथूनच काकांचे नेतृत्वात त्यांचे मार्गदर्शन व कल्पकतेतून कोयना दूध संघाची प्रगती होत गेली. काकांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत 1985 नंतरचा अपवाद वगळता निवडणुका बिनविरोध झाल्या. काकांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नातून निरनिराळ्या शहरांमध्ये कोयना दूधाची विक्री सुरू झाली. त्यामध्ये प्रामुख्याने सातारा व पुणे, मुंबई या शहरांचा समावेश आहे. शासकीय योजना टॅक्टद्वारे दूध पुरविण्यापेक्षा संघाचे स्वत:चे ब्रॅण्डचे मार्केट तयार झाले पाहिजे व स्वत:चा ग्राहक तयार झाला पाहिजे हा त्यांचा अट्टाहास होता.
दूधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व विक्री करणे ही तितकेच आवश्यक आहे हे नवीन समिकरण काकांनी पटवून दिले. कारण यापूर्वी दूध हे दूध म्हणूनच विकले गेले तरच फायदा होतो हे सर्वसाधारणपणे मान्य होते. काळाची पाऊले ओळखत दुग्धजन्य पदार्थाची भविष्यातील निकड व मुल्यवर्धित उत्पादने निर्मितीतून होऊ शकणारा फायदा लक्षात घेऊन 1995-96 मध्ये पेढा, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी यासारखी उत्पादने सुरू करण्यात आली. 1993 साली सौरऊर्जेचे महत्व ओळखून बॉयलर फिड वॉटर करिता सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करून शिवाजीराव शेडगे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
सन 2004-2005 नंतर प्रक्रिया खर्चामध्ये होत चाललेली वाढ चिंताजनक बनत चालली. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ यांचेमार्फत दीर्घमुदत कर्जे अल्प व्याजदरात उपलब्ध व्हावे याकरिता काकांकडून विशेष प्रयत्न झाले. प्राप्त कर्ज स्वरूपी भांडवलामध्ये होमोजिनाइजर, पाश्चरायजर, क्रिम पाश्चरायजर, जरनेटर इत्यादी मशिनी खरेदी करून बसविण्यात आली. इमारत जुनी झाली त्यामुळे 35,000 स्केअर फूट इमारत आवश्यक सोयी व्यवस्थेसह बांधण्याचे ठरले. सर्व सोयींनीयुक्त इमारत 2011 साली बांधून तयार झाली. नवीन अद्ययावत मशिनरी बसविण्यात आली. या सर्व कामकाजावर काकांचे बारीक निरीक्षण असे. दर दोन दिवसांनी ते प्रकल्पाची पाहणी करीत होते. 2012-13 नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक असा प्रतिदिन 1,50,000 लिटर क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित झाला. दुग्धजन्य पदार्थामध्ये वाढ होत गेली. पेढे, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, पनीर दही, ताक, तूप आदी दुग्धजन्य पदार्थाची बाजारपेठ तयार झाली.
सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. दूध संघामध्ये सौरऊर्जेद्वारे वीज निर्मितीचा हा पहिला यशस्वी प्रयोग आहे. स्पर्धात्मक युगात ग्राहकांचे हित व त्याची अन्नसुरक्षा महत्वाची बाब आहे. याच दृष्टीने संघाने अन्नसुरक्षा संबंधी आयएसओ 22000 : 2018 मानांकन मिळवले आहे. आर. डी. पाटलांचा उद्देश, काकांनी जपलेले सहकाराचे तत्व, या सगळ्यांचा वारसा जपत कोयना दूध संघ कायम प्रगती प्रथावर राहील.
-: अमोल गायकवाड
कार्यकारी संचालक, कोयना दूध संघ.