टेंभू सेक्स रॅकेट प्रकरणाची व्याप्ती वाढली ; आणखी दोघांना अटक
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील टेंभू येथील अनाथ आश्रमाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तयार केलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने तपासाला गती दिली आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून आजवर या गुन्ह्यात चौघांना अटक झाली आहे.
पोलिसांकडील माहिती अशी, टेंभू येथे अनाथ आश्रमाच्या नावाखाली महिलेस तिच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन तिला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले होते. या सेक्स रॅकेट प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आश्रम चालक महिलेसह वाल्मीक महादेव माने वय ४५, रा. म्हासोली ता. कराड या संशयिताला अटक केली होती.
त्यानंतर या प्रकरणाची राज्यात चर्चा सुरू झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी याप्रकरणी कराड पोलिसांना सखोल तपास करून कारवाईचे आदेश दिले होते. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ तीन अधिकाऱ्यांचे विशेष तपास पथक तयार करून या प्रकरणाच्या तपासाला गती दिली. या तपास पथकाने या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी दोन संशयितांना अटक केल्याने एकूणच या प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. ऋतुराज संजय शहा (वय ३८, रा. बुधवार पेठ कराड) व सचिन तानाजी माने (वय ४२, रा. टेंभू ता. कराड) अशी पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना रविवार दि. २५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली आहे.
सर्व बारकावे तपासले जात आहेत…
कराड पोलिसांनी अनाथ आश्रमाच्या नावाखाली चालवल्या गेलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. सर्व बाबी काटेकोरपणे तपासल्या जात आहेत, कायद्यानुसार कारवाई केली जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.