कालवडेचे सरपंच सुदाम मोटे यांना पदावरून काढून टाकण्याचा विभागीय आयुक्तांचा आदेश!
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरवून कराड तालुक्यातील कालवडे गावचे विद्यमान सरपंच सुदाम जगन्नाथ मोटे यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे.
याबाबतची हकीगतशी अशी, कालवडे येथील रहिवासी धनंजय नानासो थोरात यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या न्यायालयात दि. २७ जुलै २०२२ अन्वये अर्ज करुन, कालवडे ग्रामपंचायतीचे सरपंच व ८ ग्रामपंचायत सदस्य, यांचे गैरकारभारास्तव व बेकायदेशीर कामकाजास्तव, त्यांचेविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
त्यानुसार कराडच्या गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी झाली. त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने सरपंच सुदाम जगन्नाथ मोटे यांचेविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ नुसार कार्यवाहीसाठी निर्देश मिळावेत, अशी विनंती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना केली होती. याप्रकरणी जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २१ नोव्हेंबर २०२३ मध्ये विभागीय आयुक्तांना अंतीम अहवाल सादर केला होता. त्यावर विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांच्यासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे मांडण्यात आले.
नेमके प्रकरण काय….
मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या अहवालानुसार गावातील शासकीय गायरान जमीनीमधील अतिक्रमणे काढणेबाबत ग्रामपंचायतीने ठोस कार्यवाही केली नसलेचे दिसून आले. याशिवाय ग्रामनिधीतून १५ टक्के मागासवर्गीय अनुदानातून मातंगवस्तीमध्ये काँक्रीट गटर बांधणे या कामाच्या तसेच ऑफीस सुशेभीकरण या कामाच्या निविदा मागविणेत आल्या होत्या, याबाबतच्या मासिक सभा ठरावाच्या प्रतीवर पुरवठादारांचे नावाचे ठिकाणी रिकामी जागा सोडलेचे निष्पन्न झाले. त्यानुसार सदरची नावे नंतर समाविष्ट करणेत आलेचे स्पष्ट झाले. ग्रामपंचायतीचे सचिव यांचे कामावर नियंत्रण ठेवणेची जबाबदारी सरपंच यांनी पार पाडली नसलेचे दिसून आले. तसेच १४ वा वित्त आयोग निधीतुन फॉगींग मशीन खरेदी करणे, ऑफीस सुशोभीकरण कामी फर्निचर खरेदी ही कामे ई-मार्केटप्लेस व्दारे खरेदी करणे आवश्यक असताना, दरपत्रकाव्दारे खरेदी करणेत आलेचे दिसून आले. एकुणच विकास कामे करताना, व साहित्याची खरेदी करताना नियमातील तरतुदीचं काटेकोरपणे पालन झाले नाही.
याबरोबरच विषय समित्यांची रचना करताना नियमानुसार एकुण सदस्य संख्या नसणे व आरक्षित सदस्य संख्या नसणं आदी बाबी जि.प. स्तरावरील चौकशीत निष्पन्न झाल्या. दक्षता समितीमध्ये तलाठी लक्ष्मण पाटील यांची गावी नेमणूक होणेपूर्वीच नेमणुक करणेत आली असलेचे दिसून आले. याबाबत याबाबत सरपंच यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक वाटत नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केलेल्या त्यांच्या अहवालात नमूद केले होते.
सदर तक्रारीमध्ये सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचे पातळीवर अनियमितता झाली असलेचे व त्या अनुषंगाने तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. सगरे यांचेवर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणेत येत असलेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमुद करून श्री. सरपंच सुदाम जगन्नाथ मोटे यांचेविरुध्द महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९(१) प्रमाणे कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे केली होती.
त्यामुळे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, सादर झालेले पुरावे, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सविस्तर अहवाल, अभिप्राय याचे अवलोकन करून तक्रारीचे बहुतांश बाबींमध्ये तथ्य असलेचे विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निकालपत्रात नमूद केले. आणि या संपूर्ण प्रकरणात कालवडे ग्रामपंचायतचे सरपंच सुदाम जगन्नाथ मोटे यांनी कर्तव्यपालनात कसुर केल्याचा ठपका ठेवून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सरपंच सुदाम मोटे यांना तात्काळ कालवडे ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदावरुन काढुन टाकण्याचा आदेश जारी केला आहे.