‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पहिले दोन हप्ते झाले जमा ; उर्वरीत महिलांनाही या”तारखेपर्यंत मिळणार लाभ
आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ - महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे
चांगभलं ऑनलाइन | मुंबई प्रतिनिधी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, दिनांक 14 ऑगस्ट पासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांना सुद्धा दि. 17 ऑगस्ट पर्यत हा लाभ मिळणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 14 ऑगस्टपर्यत 1 कोटी 62 लाखापेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.