उंब्रज उड्डाणपुलाच्या कामासाठी नितीन गडकरी यांना भेटणार – मनोज घोरपडे
नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या यांच्याकडेही केली मागणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर महामार्गावरील कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या उंब्रज येथील सेगमेंटल उड्डाण पुलाच्या उभारणी संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे रविवारी युवा नेते व भाजपचे कराड उत्तर निवडणूक प्रभारी मनोज घोरपडे यांनी सविस्तर निवेदन देऊन चर्चा केली.
दरम्यान, यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन चर्चा करणार असल्याची ग्वाही मनोज घोरपडे यांनी दिली आहे.
पुणे-बेंगलोर महामार्ग क्रमांक 48 वर उंब्रज हे निमशहरी गाव वसले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा मोठी बाजारपेठ आहे. एका बाजूला एसटी बस स्थानक आहे. जवळच शाळा, महाविद्यालय आहे. मात्र सध्याच्या महामार्गावर या ठिकाणी भराव पूल उभारण्यात आला. त्यामुळे उंब्रजकरांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र पुणे-बेंगलोर महामार्गाच्या सहापदरीकरण कामात उंब्रजला सर्व सोयीनियुक्त असा सेगमेंटल पूल तयार करण्यात यावा, अशी या विभागातील ग्रामस्थांची मागणी आहे. गावचे लोकसंख्या 50 हजार असली तरी आसपासच्या गावातून या ठिकाणी दररोज किमान एक लाख लोक ये-जा करत असतात.
यासंदर्भात सेगमेंटल उड्डाणपुलाच्या उभारणीचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (NHAI) मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला केंद्र शासनाने तातडीने मंजुरी द्यावी. यासाठी प्रयत्न करावेत, अशी लेखी मागणी कराड उत्तर भाजपचे निवडणूक प्रभारी मनोज घोरपडे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे. या संदर्भात आपण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेचेही घोरपडे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कराड येथे यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधरअण्णा मोहोळ यांनी घेतले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष धर्यशील कदम, राज्य कार्यकारणी सदस्य अतुलबाबा भोसले, विक्रम पावसकर यांच्या समवेत कराड उत्तर निवडणूक प्रभारी मनोजदादा घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, लोकसभा संयोजक रामकृष्ण वेताळ, सुरेश खाडे, महेशबाबा जाधव आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
मनोजदादा घोरपडेंकडून स्वागत….
केंद्रीय उड्डाण वाहतूक राज्यमंत्री ना.मुरलीधर मोहोळ हे कराड येथे पक्षाच्या अधिवेशनास आले असता त्यांचे स्वागत कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, अतुलबाबा भोसले, विक्रम पावसकर, भरतनाना पाटील, रामकृष्ण वेताळभाऊ , सुरेश खाडे, महेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.