माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका उंडाळकरांचा निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड! – changbhalanews
Uncategorized

माजी मंत्री स्वर्गीय विलासकाका उंडाळकरांचा निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड!

कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक ता. कराड गावचे रहिवासी पैलवान मारुती विठ्ठल मोहिते (वय ८५ वर्षे ) यांचे आज, मंगळवार, दि. ६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने माजी मंत्री, स्वर्गीय विलासकाका पाटील-उंडाळकरांचा निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यानिमित्त…

पैलवान मारुती मोहिते तथा आबा हे बेलवडे बुद्रुक गावचे रहिवासी होते. बाजार बेलवडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील व कराड तालुक्याच्या सरहद्दीवरच्या या गावातून लोकनेते स्वर्गीय विलासराव पाटील-उंडाळकर यांना भरभरून मतदान होत असे. अगदी पहिल्या आमदारकी पासून ते विलासकाकांच्या शेवटच्या निवडणुकीतही या गावानं त्यांना भरभरून साथ केली. यामध्ये काकांचे जे काही मोजके, जुने निष्ठावंत सहकारी होते , त्यामध्ये मारूती मोहिते तथा आबा यांचा समावेश होता. विलासकाका ज्या-ज्या वेळी गावात येत, त्या-त्या वेळी ते आबांना भेटायचे, गप्पागोष्टी रंगायच्या. गावात झालेल्या सभांमध्ये विलासकाका अनेकवेळा आबांचा उल्लेख करत.

स्वर्गीय विलासकाका हे पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झाले. त्यानंतर त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळच्या त्या पहिल्या निवडणुकीपासून ते शेवटच्या निवडणुकीपर्यंत एक नेता, एक पक्ष अशीच मारुती मोहिते तथा आबा यांची त्यांच्यावर निष्ठा राहिली. आबा राजकारणात सक्रिय असताना राजकीय फायदा उचलून स्वतः मोठे होऊ शकले असते, मात्र त्यांनी कधीही स्वतःचा फायदा बघितला नाही, काकांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी काम केले. स्वर्गीय विलासकाकांच्या माध्यमातून त्यांनी गावाचे सर्वार्थाने कल्याण करण्याचा प्रयत्न केला‌.

कराड तालुक्याच्या कुस्ती क्षेत्रात पैलवान मारुती मोहिते तथा आबा यांचे मोठे योगदान राहिले. ते जुन्या पिढीतील मल्ल होते. त्यांच्या बेलवडे बुद्रुक गावातील जुनी तालीम जीर्ण झाल्याने त्यांनी नवीन तालीम गावात व्हावी यासाठी गावातील अन्य सहकाऱ्यांच्यासोबत स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. गावातील तरुण पिढी सुदृढ निर्माण व्हावी, असा त्यांचा त्यामागे अट्टाहास होता. विलासकाकांच्या माध्यमातून गावात नवीन तालीम झाली. वस्ताद असलेल्या आबांनी अनेक पैलवानांना घडविले, त्यांचे अनेक पट्टे महाराष्ट्र चॅम्पियन पर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक कुस्ती फडात, त्याकाळात आबांच्या नावाचा जयजयकार होत असे. कुस्ती क्षेत्रामुळे त्याकाळात त्यांचा मित्रपरिवार दूरपर्यंत पसरला होता. संयमी व नम्र स्वभाव, मृदू व व मित्त भाषा, ज्येष्ठांचा आदर करण्याची वॄत्ती, युवकांना सातत्याने मार्गदर्शन, असं आबांचं वागणं आणि बोलणं होतं. जेवढं बोलायचं तेवढंच करायचं अन् करायचं तेवढंच बोलायचं, असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे गावकरी त्यांचा नेहमी आदर करीत.

गावातील बेलवडे बुद्रुक सहकारी सोसायटीशी ते निगडीत होते. या सोसायटीच्या चेअरमन पदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली होती. गावातील ब्रह्मदास विद्यालयाच्या स्थापनेपासून त्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. गावातील पिढी शिक्षित व्हावी, असा त्यांचा ध्यास होता. पैलवान मारुती मोहिते तथा आबा यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज मंगळवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा मुलगा राजेंद्र, त्यानंतर माणिक, वसंत व गणेश अशी चार मुले व एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा माणिक याने ही वडिलांच्याप्रमाणे कुस्ती क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. तो सध्या रयत सहकारी साखर कारखान्यात कार्यरत आहे. तर मुलगा वसंतराव हा शेती करतो व सोयाबीन दुकान चालवतो‌. सर्व मुलांनी वडिलांचा आदर्श प्रत्यक्ष आचरणात आणला आहे.

मारूती मोहिते तथा आबांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. रक्षा विसर्जन विधी गुरुवार, दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता बेलवडे बुद्रुक येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. चांगभलं न्यूज समुहाकडून मारूती मोहिते तथा आबांना भावपूर्ण श्रद्धांजली!!

– हैबतराव आडके
संपादक, चांगभलं™
Print | Web | YouTube

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close