आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून ‘कराड उत्तर’मधील ‘या’ गावच्या नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार ; राजकीय चर्चांना उधाण
चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील बेलवडे हवेली गावच्या सरपंचपदी सौ. अंजना प्रकाश पवार यांची सर्वानुमते निवड झाली आहे. सौ. पवार या काँग्रेस पक्षाच्या सदस्या असून त्यांची सरपंच पदी नियुक्ती झाल्याने गावातील काँग्रेसच्या सदस्यांना एक ताकद मिळाली आहे. यानिमित्त राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रकाश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, कराड उत्तर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रताप पवार, माजी उपसरपंच सूर्यकांत पाटील, महेश कुंभार, शिवाजी इनामदार, अशोक पवार, लालासाे पवार, मोहन पवार, प्रकाश पवार, सुशांत इनामदार आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, सरपंच हा गावचा प्रमुख म्हणजेच एकप्रकारे कुटुंब प्रमुखच असतो. गावातील सार्वजनिक कामे प्राधान्याने मार्गी लावली पाहिजेत. गावातील बंधुता अखंडता ठेवण्यासाठी कायम प्रयत्न केले पाहिजेत. शासकीय योजनांचा जास्तीत जास्त उपयोग ग्रामस्थांना होण्यासाठी सरपंच व त्यांच्या सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
कराड उत्तर मधील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रयत्न ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
दरम्यान, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारांच्या कार्यकर्त्यांची एक फळी आहे. यामधील जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना राजकीय बळ देण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा कराड उत्तर मध्ये मोठा वर्ग आहे. त्यांना मानणारे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यही आहेत. याशिवाय काँग्रेसचे सरचिटणीस ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांची मजबूत रयत संघटना कराड उत्तरमध्ये कार्यरत आहे. राष्ट्रीय काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा व त्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभा सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात डावपेचांची पेरणी करण्याचा काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांचा आत्तापासूनच प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.