अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख 55 हजार रुपये दंडाची शिक्षा
कराड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेऊन, तिचे इच्छेविरूध्द शरिरसंबंध केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व एकुण रक्कम १,५५,००० रूपये दंडाची शिक्षा सुनावली
या घटनेची हकीकत अशी की, दि. ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी यातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय १५ वर्षे ७ महिने ही शाळेतून घरी आलेली नसल्याने घरातील लोकांनी तिच्या शाळेत चौकशी केली असता ती शाळेत आलेली नाही म्हणुन तिचा घराशेजारी व पै-पाहुण्यांमध्ये शोध घेतला. परंतु ती न मिळाल्याने तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरिता कशाची तरी फुस लावुन पळवुन नेलेची खात्री झाल्याने पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यात आली.
फिर्यादी यांची मुलगी पळवुन नेल्यामुळे गावात विचारपुस केली असता गावातील रोहित थोरात याच्याबद्दल माहिती मिळाल्याने पोलिस बारामती भागात त्याला शोधण्यासाठी गेले. त्यांना सदर मुलगी रोहित रमेश थोरात याच्यासोबत मिळुन आली. सदर आरोपीने पिडीत मुलीसोबत मैत्री करुन तिच्यासोबत व्हॉट्सअपवर बोलून तिला विश्वासात घेवून तिला फोनवर सांगितले की, घरात कॉलेजला जाते म्हण. दप्तरात ड्रेस घे व तुझी कागदपत्रे घेऊन तू ढेबवाडी स्टँडवर ये. आपण फिरायला जाऊ. तू आली नाहीस तर मी जीव देईन असे म्हणाल्यावर पिडीत मुलगी ही आरोपीसोबत बारामतीला गेली. बारामती येथे लॉजवर पिडीत मुलीचे इच्छेविरुध्द आरोपीने शरीरसबंध केले व पिडीत मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्वेलर्सच्या दुकानात विकून ते पुणे येथे गेले. त्यानंतर सासवड येथील लॉजवर ढेबेवाडी पोलिसांनी त्यांना पकडले. याप्रकरणी विविध कलमान्वये आरोपी रोहित रमेश थोरात रा. जानुगडेवाडी, ता.पाटण, याच्याविरुध्द ढेबेवाडी पो. स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांच्या न्यायालयात चालला. खटल्यात सरकारी वकील आर. सी. शहा यांनी सरकार पक्षातर्फे एकूण ८ साक्षीदार तपासले व युक्तीवाद केला. तसेच तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एम.एस. तलबार तसेच फिर्यादी, साक्षीदार, ज्वेलर्सच्या दुकानाचे मालक यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सदरचा गुन्हा कोर्टात शाबीत झाल्याने आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरून विविध कलमान्वये २० वर्षे सश्रम कारावास व एकूण १ लाख ५५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर पिडीतेस दंडाच्या रकमेतून नुकसान भरपाई म्हणून ७५,०००/- रुपये देण्याचा आदेश न्यायालयाने केलेला आहे. या खटल्यात सरकार पक्षाला पैरवी अधिकारी पोलीस हवालदार पी. व्ही. भिंगारदेवे , महिला पोलीस वाय, जी. पवार यांनी सहकार्य केले.