कराड अर्बन बँक देणार सभासदांना १० टक्के लाभांश ; वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांची घोषणा
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड अर्बन बँकेच्या १०७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश देत असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केली.
बँकेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २८ जुलै रोजी कराड येथील पंकज मल्टिपर्पज हॉल येथे बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव आणि सर्व संचालक तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी व सर्व सदस्यांसह सभासदांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा रू.५००० कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार करत एकूण व्यवसाय रू.५१८६ कोटींवर पोहोचविला आहे. यामध्ये रू.३२६१ कोटींच्या ठेवी तर रू.१९२४ कोटींचा कर्ज व्यवसाय आहे. बँकेला एकूण रु. ३७.११ कोटींचा ढोबळ तर, आयकर व तरतुदी वजा जाता रु. २४.१२ कोटींचा निव्वळ नफा झाला असून बँकेने आपली सक्षमता व सदृढता कायम राखली असल्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी सांगितले.
बँकेने मागील वर्षीप्रमाणे वसुलीच्या कामकाजामध्ये कृती आराखड्याची अंमलबजावणी करत जुन्या आणि नवीन एन.पी.ए. खात्यांतून लक्षणीय वसूली करत असताना नक्त एन.पी.ए. चे प्रमाण ०.४४% इतके राखले आहे. सभासदांना १०% लाभांश देत असल्याची घोषणा यावेळी बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी केली. त्याचप्रमाणे सभासदांना मागील सर्वसाधारण सभेमध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत ग्राहकसेवेमध्ये वाढ करून रिझर्व्ह बँकेकडून मोबाईल बँकिंगसाठीची परवानगी मिळविली आहे. तरी सर्व सभासदांनी मोबाईल बँकिंग जास्तीत जास्त वापरून फायदा करून घ्यावा. येत्या काळात कराड अर्बन बँक सहकार क्षेत्रामध्ये अधिक सक्षम आणि सदृढ असेल, असा विश्वास अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी यावेळी व्यक्त केला.
बँकेच्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व विस्तृत होत असून चालू वर्षांत भांडवल पर्याप्तता प्रमाण (सी.आर.ए.आर.) १६.१६% राखून आपली सक्षमता आणि सुदृढता आर्थिक प्रमाणकांवर सिद्ध केली आहे. एकूण ६२ शाखांपैकी २४ शाखांचा एन.पी.ए. शून्य टक्के असून निव्वळ एन.पी.ए.चे प्रमाण ०.४४% इतके राहिले आहे. बँकेच्या ६२ शाखांपैकी एकूण ४९ शाखांनी नफा मिळवला असून २६ शाखांना रु.१ कोटींपेक्षा अधिक नफा झाला आहे. नव्याने सुरू केलेल्या १० शाखांनी ३-४ महिन्यांमध्ये सुमारे १०० कोटींचा व्यवसाय करून ग्राहकसंख्येत लक्षणीय वाढ करून दिली आहे. यातून बँकेवर समाजाचा असणारा अढळ विश्वास अधोरेखित होत आहे, असे मत माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी व्यक्त केले.