पाटणच्या वीज वितरण कर्मचाऱ्यांना ‘सॅल्यूट’!
दुर्गम भागात अंधारलेल्या पाच गावात जीवाची बाजी लावून केला वीज पुरवठा सुरळीत

चांगभलं ऑनलाइन | पाटण प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात सध्या पावसाची संततधार गेल्या 2/3 दिवसापासून सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. काही ठिकाणी पुलावरून पाणी जातं आहे तर काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडल्याच्या देखील घटना घडत आहेत. याबाबत पाटण प्रशासन रात्रंदिवस अलर्ट असून याबाबत तात्काळ उपाय योजना देखील करण्यात येत आहेत. या सर्व परिस्थितीवर पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील लक्ष ठेऊन असून ते तालुक्यातील अधिकारी याना वेळोवेळीसूचना देखील देत आहेत.
या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील रासाटी शाखेअंतर्गत येणाऱ्या देवघर येथे अतिवृष्टीमुळे एकूण 5 HT विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्यामुळे दुर्गम भागातील एकूण 5 गावे अनुक्रमे गोवारे, तलोशी, वाघणे, नाव, चिरंबे अंधारात गेली होती. ही बाब स्थानिक पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी तहसीलदार पाटण व प्रांताधिकारी पाटण यांचे निदर्शनास आणून दिली. अतिवृष्टी सुरू असल्याने दुर्गम भागात विद्युत पुरवठा सुरू असणे आवश्यक असल्याने यासंदर्भात महसूल प्रशासनाने वीजवितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने विद्युत पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे बाबत सूचना दिल्या. त्यास विद्युत पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. वीज वितरण विभागाचे उपअभियंता श्री कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता श्री मंगेश क्षीरसागर , वायरमन श्री आकाश कुंभार , श्री अमित सपकाळ यांनी तात्काळ जीवाची बाजी लाऊन पाऊस सुरू असताना देखील तलावात पोहत जाऊन विद्युत तारा ओढून विद्युत पुरवठा सुरळीत केला.
त्यामुळे विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्याने स्थानिक ग्रामस्थ यांनी समाधान व आनंद व्यक्त केला. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी पाटण यांनी संबंधित वीज वितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल कौतुक केले आहे.
पाटण मधील सर्वच विभागाचे कर्मचारी अतिवृष्टी दरम्यान सज्ज असून कुठेही काही अडचण आली तर त्यास संबंधित विभागातील अधिकारी कर्मचारी तत्परतेने प्रतिसाद देतात. त्यामुळे पाटणमध्ये अतिवृष्टी दरम्यान कुठलीही अडचण आली तर ती सक्षमपणे हाताळली जाईल असा विश्वास आहे. वीजवितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता निश्चितच प्रशंसनीय आहे
– सुनील गाढे प्रांताधिकारी पाटण.