डॉ. अतुल भोसले यांची उपमुख्यमंत्र्यांकडे ६.३८ कोटींच्या निधीची मागणी
ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराडचा पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी कोयना नदी पात्रातील पाईपलाईनची दुरुस्ती, तसेच जुन्या जॅकवेलचे काम तातडीने करण्याची गरज आहे. या दुरुस्ती कामांसाठी ६.३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा, अशी भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. कराडकरांची गैरसोय दूर करण्यासाठी ना. फडणवीस यांनी या मागणीची दखल घेत, याबाबत प्रशासनाला तत्काळ कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत.
कोयना नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे पाईपलाईनमध्ये बिघाड होऊन कराडचा पाणीपुरवठा रविवार (ता. १४) पासून खंडीत झाला आहे. त्यामुळे गेले ४ दिवस कराडवासीयांना गंभीर पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले कंबर कसून मैदानात उतरले आहे. नगरपालिकेच्या पंपिंग स्टेशनला वेळोवळी भेट देऊन, तिथे सुरु असलेल्या कामाचा त्यांनी सातत्याने आढावा घेतला. किंबहुना जुने पंपिंग स्टेशन तातडीने कार्यान्वित करुन, कराडचा पाणीपुरवठा ताबडतोब सुरळित करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय कृष्णा समूहाच्या माध्यमातून गेल्या ४ दिवसांत २० टँकरद्वारे शहरात ठिकठिकाणी लाखो लिटर पाण्याचा पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, कराडचा पाणीपुरवठा सुरळित होण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून जलशुद्धीकरण केंद्रातील जुने जॅकवेल सुरु करण्याचे काम नगरपरिषदेकडून युद्धपातळीवर सुरु आहे. पण सदरचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. तसेच जुने जॅकवेल ७ वर्षे बंद अवस्थेत होते. त्यामुळे ते सुरु झाले तरी मुबलक पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे जुन्या जॅकवेलचे पंपसेट, आवश्यक मशिनरी खरेदी, विद्युत पुरवठा आणि गाळ काढण्याच्या कामासाठी तातडीने ३.७५ कोटींच्या निधीची गरज नगरपालिकेला भासणार आहे.
याशिवाय कोयना नदी पात्रातील बिघाड झालेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी २.६३ कोटींचा निधी लागणार आहे. त्यामुळे कराड शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी एकूण ६.३८ कोटींचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशा मागणीचे पत्र डॉ. अतुल भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना आज दिले. कराडमधील या पाणीसमस्येची तीव्रता लक्षात घेऊन, डॉ. भोसले यांच्या पत्राची दखल घेत ना. फडणवीस यांनी याबाबत प्रशासनाला तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.