‘कृष्णा’ धावला कराडकरांच्या मदतीला
कराडचा पाणीपुरवठा ताबडतोब सुरळित करा ; डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या पालिका प्रशासनाला सूचना
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने, कराड शहरावासीयांना गेल्या २ दिवसांपासून पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आज पंपिंग स्टेशनला भेट देऊन या समस्येची पाहणी केली. यावेळी त्यांनी कराडचा पाणीपुरवठा ताबडतोब सुरळित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या. त्यानुसार संध्याकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त करुन शहरात पाण्याचा सुरळित पुरवठा करण्याची ग्वाही पालिका प्रशासनाने डॉ. भोसले यांना दिली.
दरम्यान, डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून कराडवासीयांची पाण्याविना गैरसोय होऊ नये, यासाठी शहरात प्रत्येक दीड तासाला सुमारे ३५ हजार लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे.
पुणे – बंगळुरु महामार्गावरील कोयना पुलाच्या जवळच नवीन दुसरा पूल उभारणीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. त्या पुलाचे काम करण्यासाठी नदीत भराव टाकून काम केले जात आहे. ते काम करताना कराड नगरपरिषदेच्या वारुंजी येथील जॅकवेलकडून, कराडच्या पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्रात आणलेल्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने, शहराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे गेल्या २ दिवसांपासून शहरावासीयांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पंपिंग स्टेशनला भेट देऊन, शहराला तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी काय करता येईल, याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे, अधिकारी ए. आर. पवार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पाईपलाईनमधील बिघाड तातडीने दुरुस्त करुन, शहराचा पाणीपुरवठा ताबडतोब सुरळित करावा, अशा सूचना डॉ. भोसले यांनी पालिका प्रशासनाला दिल्या. त्यानुसार जुन्या पंपिंग स्टेशनमधील काम तातडीने मार्गी लावून, आज संध्याकाळपर्यंत शहराचा पाणीपुरवठा सुरु करण्याची ग्वाही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, भविष्यातील धोका टाळण्यासाठी पाण्यातून जाणारी पाईपलाईन पुलालगत करण्याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. याप्रश्नी नगरपालिकेने पत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी माजी नगरसेवक सुहास जगताप, मुकुंद चरेगावकर, महादेव पवार, रमेश मोहिते, प्रमोद शिंदे, शैलेंद्र गोंदकर, उमेश शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कृष्णा समूहाकडून शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठा
पाण्याविना कराडकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा समूहाच्या माध्यमातून शहरात प्रत्येक दीड तासाला सुमारे ३५ हजार लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे केला जात आहे. त्यामुळे शहरवासीयांची पाण्याची गैरसोय टळली आहे.