सातारा जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘इतक्या’ महिलांची नोंदणी
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी अत्यंत गतीने सुरु आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 12 हजार 84 महिलांचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. दर दिवशी हा आकडा वाढविण्यासाठी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनातील सर्व घटक कसोशीने कार्यरत आहे.
सातारा जिल्ह्यात घरोघरी जावून महिलांचे रजिस्ट्रेशन करुन घेण्याचा उपक्रम राज्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे. जिल्ह्यात झालेल्या 1 लाख 12 हजार 84 नोंदणीमध्ये 38 हजार 952 अर्ज ऑनलाईन पध्दतीने तर 72 हजार 791 अर्ज ऑनलाईन पध्दतीने नोंदणी झाले आहेत.
योजनेचा उद्देश :- राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक अटी शर्ती – योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अविवाहित असावी. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. (डोमासाईल, डोमासाईल नसल्यास १५ वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड/मतदान ओळखपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला या पैकी कोणताही एक रहिवाशी पुरावा आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अविवाहित. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्यांचे बैंक खाते आवश्यक असून सदर बँक खात्यास आधार लिंक असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तथापी पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. पात्र कुंटूंबातील फक्त एक अविवाहीत महिला सदर योजनेचा लाभ घेऊ शकते.
अपात्रता- ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रु. पेक्षा अधिक आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतू बाहय यंत्रणाव्दारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणा-या अधिक योजनेव्दारे रु.१५००/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉपोरेशन/बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष / संचालक/सदस्य आहेत. कुटूंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहने नावावर असल्यास (ट्रॅक्टर वगळून) अपात्र.
वरील अटी व शर्तीची पूर्तता करुन पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा.परिपूर्ण झालेले अर्ज सादर करावयाचे ठिकाण- ग्रामीण भागातील महिलांनी अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/सेतू सुविधा केंद्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक यांचेकडे सादर करावेत. शहरी भागातील अंगणवाडी सेविका/मुख्यसेविका/वार्ड अधिकारी/सेतु सुविधा केंद्र यांचे कडे सादर करावेत.