ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं लेखी द्यावं ; सगेसोयरेमुळे ओबीसीच नव्हे तर एससीएसटी आरक्षणही बाधित होणार – लक्ष्मण हाके
चांगभलं ऑनलाइन | वडीगोद्री (जालना)
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला लेखी द्यावे. हे जोपर्यंत सांगितले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं ओबीसी आरक्षण बचावसाठी बेमुदत उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांनी ठणकावलं आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून तो मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने सुरू असल्याचा तसेच लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत असल्याचा आरोपही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलायं.
ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वडीगोद्री येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आज सकाळी हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सगेसोयरेचा अध्यादेश लागू झालाच तर फक्त ओबीसीच नव्हे तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावरही मर्यादा येईल , ते बाधित होईल, असंही हाके यांनी सांगितलं.
ओबीसी कोण हे तरी त्यांना माहिती आहे का ? अशी टीका हाके यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यावर केली. तसेच माझ्या समोर चर्चेला बसा, मी सर्व उत्तरे देतो, असे खुले आव्हानच हाके यांनी जरांगेंना दिले. भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा जरांगेंचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही ओबीसी म्हणून महाराष्ट्रात एकत्र येत नाही त्यामुळेच यांचं फावलं आहे. आमचे ओबीसींचे संघटन भक्कम असते तर आमच्या आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा ठेवला नसता, असेही हाके यांनी म्हटले.