
चांगभलं ऑनलाइन |
राज्यात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला. यामागे मराठा आरक्षण आंदोलनामुळे तयार झालेला ‘जरांगे फॅक्टर’ कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर संघटन करणारे स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांच्या ‘जय शिवसंग्राम संघटने’ला राज्यातील महायुतीने घटक पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. अर्थात रामहरी मेटे यांच्या पाठिंब्याचा महायुतीला कितपत फायदा होतो, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होणार आहे.
याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. रामहरी मेटे हे एकेकाळी मराठा आरक्षणाची चळवळ बुलंद करणारे लोकनेते स्वर्गीय विनायक मेटे यांचे बंधू आहेत.
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या तर महायुतीची पीछेहाट झाली. यामागे मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे उदयास आलेला ‘जरांगे फॅक्टर’ कारणीभूत असल्याची चर्चा राज्यभरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्वर्गीय विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांच्या जय शिवसंग्राम संघटनेने महायुतीला दिलेला पाठिंबा चर्चेत आला आहे. रामहरी मेटे हे त्यांचे बंधू लोकनेते विनायक मेटे यांच्यासोबत तत्कालीन शिवसंग्राम संघटनेत कार्यरत होते. महायुतीला पाठिंबा देताना विधानसभेच्या पाच जागा पक्षाच्या माध्यमातून लढविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत बोलताना रामहरी मेटे यांनी सांगितले की, पाच महिन्यापूर्वी आपण रायगडावर जाऊन जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली आहे. गेल्या पाच महिन्यात राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करून साहेबांच्यावर ( विनायक मेटे) प्रेम करणाऱ्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना संघटित करून संघटना बांधली आहे. लोकसभा निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीकडून तसेच महायुतीकडून पाठिंबाबाबत विचारणा झाली होती, असा दावा त्यांनी केला आहे. ‘मात्र साहेब (विनायक मेटे) हे 2014 पासून शेवटपर्यंत महायुती सोबत होते. त्यामुळे आपण महायुतीच्या नेत्यांच्या सोबत चर्चेला बसलो. आणि महायुतीला पाठिंबा दिला” असे रामहरी मेटे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रामहरी मेटे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, समन्वयक प्रसाद लाड यांची भेट घेऊन संघटनेच्या पाठिंब्याचे पत्र सादर केले आहे. महायुतीकडून घटक पक्ष म्हणून मेटे यांच्या जय शिवसंग्राम संघटनेला मान्यता देण्यात आली आहे. तसे पत्र समन्वयक प्रसाद लाड यांनी रामहरी मेटे यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुनील तटकरे यांच्या संमतीने हे पत्र देण्यात येत असल्याचे लाड यांनी म्हटले आहे. मात्र मेटे यांच्या पाठिंब्याचा महायुतीला कितपत फायदा होतो, हे येणाऱ्या निवडणूकांमध्ये स्पष्ट होणार आहे. जय शिवसंग्राम संघटना महायुतीमध्ये सहभागी झाल्याने महायुती मधील घटक पक्षांची संख्या वाढली आहे.