शिवराज्याभिषेक दिनी वसंतगडावर वृक्षारोपणासह संवर्धनाचा संकल्प
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
गडकिल्ले म्हणजे इतिहासाचे मूक साक्षीदार…. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत , शेकडो वर्षे ऊन, वारा, पाऊस झेलत ते उभे आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन म्हणजे इतिहासाचे जतन. त्यामुळे या गडकिल्ल्यांच्या परिसरात वनराई बहरावी व त्यातून गडकिल्ल्यांची निसर्ग वैभव कायम रहावे, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे , यासाठी कराडच्या वसंतगडावर पायथ्याला वृक्षारोपण करण्यात आले. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला.
मलकापूर शहरातील विठ्ठलदेव हौसींग सोसायटीमधील सामाजिक कार्यकर्त्या अॅस्ट्रोलॉजिस्ट वृषाली दिनेश चव्हाण-पाटील यांच्या संकल्पना व वन विभागाचे सहकार्य यामधून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधण्यात आले.
या उपक्रमांतर्गत वसंतगडाच्या पायथ्याला फळझाडे व सावली देणाऱ्या वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. तसेच या रोपांचे जतन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी दिनेश चव्हाण, सिंधू पाटील, विशाखा जाधव, ज्योती चव्हाण, डॉ. पुनम हाके, अगस्त्य हाके, सिद्धेश जाधव, सचिन जगताप, शर्मिष्ठा चव्हाण, शिवांश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अॅस्ट्रोलॉजिस्ट वृषाली चव्हाण-पाटील म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा इतिहासातील सुवर्णक्षण. या सोहळ्याचे औचित्य साधत राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गडकिल्ले म्हणजे छत्रपतींच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. त्यांच्या या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी तसेच त्याचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी किल्ल्यांच्या परिसरात प्रत्येकाने किमान एक झाड लावले पाहिजे व त्याचे संवर्धनही केले पाहिजे ’ असे अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.