मनोज जरांगे म्हणाले मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचंच ठरवलं असलं तर…. – changbhalanews
राजकियराज्य

मनोज जरांगे म्हणाले मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचंच ठरवलं असलं तर….

मनोज जरांगे पाटील यांनी 8 तारखेच्या आंतरवाली सराटीतील उपोषणाबाबत जाहीर केली ही भूमिका

चांगभलं ऑनलाइन | आंतरवाली सराटी

मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी म्हणून आरक्षण मिळावे या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशीच 4 जून रोजी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र आदर्श आचारसंहिता सुरू असल्याचे कारण सांगून पोलिसांनी परवानगी नाकारली. तर दुसरीकडे आंतरवाली सराटी मधील काही ग्रामस्थांनी जरांगे यांचे हे उपोषण आंतरवाली सराटी मध्ये करण्यास परवानगी देऊ नये असे निवेदन प्रशासनाला दिल्याने सुरुवातीला संतप्त झालेल्या जरांगे यांनी 8 तारखेपासून आंतरवाली सराटी मध्येच उपोषण करण्याचा निर्णय वृत्तवाहिनीशी बोलताना जाहीर केला होता. मात्र काल रात्री घडलेल्या या घडामोडीनंतर काही वेळातच रात्री उशिरा मनोज जरांगे पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसारित करत 8 जून पासून होणारे उपोषण हे अंतरवाली सराटी मध्ये होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे की, मराठा आंदोलनामुळे अंतरवाली सराटीचे नाव जगभरात पोहचले. मात्र गावातील काहींनी आता गावात उपोषण घेऊ नये, उपोषणाला परवानगी देऊ नये, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते वगैरे मागणी प्रशासनाकडे केली आहे. इतरांचे काय त्यांचा विरोध राहणारच. ही मागणी त्यांनी केली असती तर.. तर मी समजू शकलो असतो, पण मराठ्यांनीच मराठ्यांना हरवायचं ठरवलं असलं तर आपण हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे. यश टप्प्यात आलं की फितुरी होत असते, हा इतिहास आपल्याला माहित आहेच.

माझ्यामुळे अंतरवाली सराटी मधील सामाजिक सलोखा बिघडतोय असं काहींचं म्हणणं पडतंय. गावात लोकं एकमेकांशी बोलत नाहीत, एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होत नाहीत, असं काहींचं म्हणणं आहे ‌. पण खरंतर यामागे सरकारचे षडयंत्र आहे. निवेदन देणाऱ्यांना मी दोष देत नाही. त्यांच्या मागे सरकार आहे. सरकारला हे आंदोलन होऊ द्यायचे नाही, झाले तरी ते हाणून पाडायचे आहे, त्यासाठी सरकारचा हा डाव आहे. पण सरकारचा, विशेषता: देवेंद्र फडणवीस यांचा हा डाव आहे. तो मी कदापी यशस्वी होऊ देणार नाही. म्हणून समाजाने शांतता ठेवावी आणि संयम बाळगावा.

गावातील काही लोकांचं म्हणणं आहे की मी आंतरवाली सराटीमध्येच उपोषण करावं. पण उपोषण झालं तर काहीजण स्वतःच स्वतःच्या गाड्या फोडतील , किंवा काही विध्वंसक घडवून आणतील. त्यामुळे सरकारला आयती संधी मिळेल. ‘आम्ही अगोदरच सांगितलं होतं की असं घडू शकतं’, असं पुन्हा बोललं जाईल. त्यामुळे आपले काही मराठा बांधव जरी म्हणत असले तरी आंतरवाली सराटीत उपोषण नको हा माझा हट्ट आहे.

याचा अर्थ मी आंदोलनातून माघार घेतली असा कोणीही काढू नका, मी मागे हटलेलो नाही, हटणार नाही. मी महाराष्ट्रात कोठेही आंदोलन करेन पण माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच देईन. पण अंतरवालीत उपोषण नको, तुमचे गाव गुण्यागोविंदाने नांदू द्या. आज पर्यंत मराठा समाजाची गावाने चांगली सेवा केली त्याबद्दल समाज गावाचा आभारीच आहे.

माझ्यामुळे जातीवाद झाला, वगैरे काहींचे म्हणणे आहे. मात्र हे तर फार पूर्वीपासून चालत आले आहे. मी फक्त माझ्या मराठा समाजाचा स्वाभिमान जागा केला. त्यांच्या समाजावर अन्याय झाला की ते कचाकच बोलतात. मग माझ्या समाजावर अन्याय होत असेल तर मी ही कचाकच बोलणारच, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

माझ्या मायबाप मराठ्यांसाठी मी कोठेही आंदोलन करेन, उपोषणाला बसेन. माझे रक्त सांडले तरी चालेल. पण मी माघार घेणार नाही. पण मराठा समाज बदनाम होऊ नये, सरकारला कारवाई करायला संधी मिळू नये, यासाठी आंतरवाली सराटी मध्ये 8 जून पासूनचे उपोषण होणार नाही, यावर मी सध्या तरी ठाम आहे. सध्या तरी माझी मानसिकता हीच आहे. त्यामुळे समाजाला विचारून उपोषण कोठे करायचे ते लवकरच ठरवू. पण उपोषण होणारच आणि मी आरक्षण मिळवून देणारच, हे मराठा समाज बांधवांनी लक्षात घ्यावे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी या व्हिडिओद्वारे स्पष्ट केले आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी काय म्हटलंय, पहा व्हिडिओ

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close