थांबा! तुम्ही व्हाट्सअप ग्रुप एडमिन आहात. मग पोलिसांची ही सूचना तुमच्यासाठीच…
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या (4 जून) रोजी जाहीर होणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल उद्या जाहीर होईल, या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाचे विविध प्लॅटफॉर्मवरील अकाउंट, तसेच व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन यांनी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सुजाण नागरिकांना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येते की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक 16/03/2024 पासून ते दिनांक 06/06/2024 रोजी पावेतो आदर्श आचारसंहिता अंमलात असून सातारा जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निकाल दिनांक 04/06/2024 रोजी जाहीर होणार आहे. त्या अनुषंगाने आपणांस सुचित करण्यात येते की, कोणीही नागरिक सदर निवडणूक निकाल दरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, रिलस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत. तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये. डीजे वाजवु नये, फटाके फोडू नये तसेच विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये ‘only admin असा बदल’ करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोष्ट ग्रुप वर टाकणार नाहीत. जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी., असा इशाराही कराड ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
झालं इलेक्शन…जपा रिलेशन…
कराड तालुक्यासह सर्व जनतेला चांगभलं न्यूजच्या वतीने ही आम्ही आवाहन करत आहोत की मतदान यापूर्वीच झाले आहे. उद्या मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. ज्यांना करायचं होतं त्यांना आपण मतदान ही केलं आहे. निवडणुकीत हार-जीत ठरलेली असते. त्यामुळे कोणीतरी विजयी होणार तर कोणीतरी पराभूत होणार हे आपण गृहीत धरून आनंद उत्सव साजरा करताना त्याला गालबोट लागणार नाही. कोणावरी जातीय किंवा धार्मिक भावनेतून टीकाटिप्पणी होणार नाही, फालतू घोषणाबाजी होणार नाही, कोणाला हिणवलं जाणार नाही, याची काळजी घ्यावी. हेच सुजाण नागरिक म्हणून आपल्याकडून अपेक्षित आहे. झालं इलेक्शन… आता जपू रिलेशन, असा संदेश या निमित्ताने आम्ही देत आहोत.
– संपादक, चांगभलं न्यूज.