चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मरगळवाडी ता. माण जिल्हा सातारा येथील राज उर्फ जगु म्हाकु मरगळे हा रोजंदारीवर कामाला गेला असता वीज पडून मृत्यूमुखी पडला होता. या दुर्घटनेनंतर त्याच्या दोन भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथील अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने घेतली आहे.
दरम्यान, मृत राज मरगळे यांच्या कुटुंबीयांना हातभार लागावा म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टकडून कुटुंबियांना १० हजार रुपयांचा धनादेश ट्रस्टचे अध्यक्ष व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी राज याच्या दोन्ही भावाचा शैक्षणिक खर्च केला ट्रस्ट कडून केला जाईल, असे काकडे यांनी जाहीर केले.
राज याचे वय वर्षे फक्त १४ वर्षे होते. वडील गेली ८ वर्षे झाली पॅरलिसमुळं अंथरुणावर खिळून आहेत. त्यांचा राज हा सर्वात मोठा मुलगा होता. महिलांच्या आजारपणामुळे राज आणि त्याची आई दोघेही दररोज रोजंदारीवर कामाला जाऊन दवाखान्याचा खर्च भागवण्यासाठी धडपड करायचे. शाळेला सुट्टी मिळेल तेंव्हा राज हा आईसोबत मजुरीसाठी जायचा. मात्र गुरुवार, दिनांक १६ मे २०२४ रोजी तो मजुरीला गेल्यानंतर त्याच शेतात वीज पडली, त्यामध्ये राज मृत्यूमुखी पडला. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला. या कुटुंबावर नियतीने घाला घातला. राज हा होतकरू मुलगा होता, शिक्षण पुर्ण करुन त्याला सैन्य भरती होऊन देशाची आणि समाजाची सेवा करायची इच्छा होती. त्याच्या दोन्ही लहान भावांना चांगलं शिक्षण द्यायचं होतं. परंतु नैसर्गिक आपत्तीच्या दुर्घटनेत कुटुंबातील कर्त्या राजचे निधन झाले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ऑल इंडिया धनगर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी राज मरगळे याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या कुटुंबाला आधार देऊन मानसिक बळ दिले पाहिजे तरच समाजाचा विकास होईल, असे प्रवीण काकडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. या कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी अहिल्यादेवी ट्रस्टच्या माध्यमातून अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी मरगळे कुटुंबीयांना दहा हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच राजच्या दोन लहान भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी ही ट्रस्टच्या माध्यमातून घेत असल्याचे काकडे यांनी जाहीर केले.
यावेळी सुखदेव लाडे (लाडेवाडी), प्रा. हणमंतराव घुटुगडे, मनीषा मरगळे, नाना मरगळे, भाऊ अभय, निलेश, पोपटराव शिंगाडे, संतोष कारंडे, विकास कारंडे, बापू मरगळे, हिराप्पा शिंगाडे, कुबेर मरगळे, धोंडीराम शिंगाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.