लेकीच्या यशाने भारावले ग्रामस्थ! – changbhalanews
शैक्षणिक

लेकीच्या यशाने भारावले ग्रामस्थ!

बेलवडेच्या श्नेयाने मिळवले एमबीबीएसच्या सर्व विषयात गोल्ड मेडल

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
परीक्षा असो..खेळ असो किंवा करिअर असो त्यामध्ये मुलाने यश मिळवलं तर नेहमी कौतुक होतंच, पण लेकीनं मिळवलेलं यशही काही कमी नसतं, तिचंही गावभर कौतुक होतं, तसं व्हायलाही हवं. असंच काहीसं वातावरण सध्या कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक गावामध्ये पहायला मिळत आहे. कारण गावच्या लेकीने कराडच्या नामांकित कृष्णा विश्व विद्यापीठात वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसच्या द्वितीय वर्षातील सर्व विषयात गोल्ड मेडल व प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी प्रथम वर्षातही तिने सर्व विषयात गोल्ड मेडल पटकावून प्रथम क्रमांक मिळवला होता. तिच्या या यशाने ग्रामस्थ भारावून गेले असून ग्रामस्थांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

कु. श्रेया हर्षवर्धन मोहिते असे तिचे नाव. श्रेया ही सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले यांचे सहकारी व गावचे माजी सरपंच स्व. मोहनराव मोहिते यांची नात. तिचे वडील हर्षवर्धन मोहिते हे कराड तालुक्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ते भाजपचे पदाधिकारी असून राजकीय क्षेत्रात भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांचे सहकारी म्हणून कार्यरत आहेत.

श्रेया ही बेलवडे बुद्रुक गावची सुकन्या. तिचे बालपण बेलवडे बुद्रुक येथेच गेले आहे. तर प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण कराडमधीलच कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई पॅटर्न) येथे झाले आहे. शिक्षणातील आणि विशेषता: वैद्यकीय क्षेत्रातील तिची आवड पाहून वडील हर्षवर्धन मोहिते आणि आई जयश्नी.यांनी तिला प्रोत्साहन दिले. गुणवत्ता आणि कुटुंबाचे पाठबळ या जोरावर तिने कराडच्या नामांकित कृष्णा विश्व विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजला एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवला.

या एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षात श्रेयाने यशाची उत्तुंग भरारी घेताना सर्व विषयात गोल्ड मेडल पटकावले. सध्या ती तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. एमबीबीएस पदवी घेतलेले तिच्या बेलवडे बुद्रुक गावात काही मोजके डॉक्टर आहेत. ते महाराष्ट्राच्या विविध भागात सेवा देत आहेत. त्याच दिशेने श्रेयाची वाटचाल आहे. नुकताच कृष्णा विश्व विद्यापीठाचा पदवीदान समारंभ पार पडला. त्यामध्ये एमबीबीएस द्वितीय वर्षातील ‘ॲनाटोमी’, ‘बायोकेमिस्ट्री’ , ‘मायक्रोबायोलॉजी’, या सर्व विषयात प्रथम क्रमांक मिळवून तब्बल चार गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. यापूर्वी तिने या अभ्यासक्रमात प्रथम वर्षात पहिला क्रमांक पटकावून सर्व विषयात गोल्ड मेडल मिळवले होते.

या यशाबद्दल कृष्णा विश्व विद्यापीठाच्या १२ व्या पदवीदान समारंभात कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर , कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, दिलीप पाटील, सौ. मनिषा मेघे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, मेडिकल अॅकडमिनिस्ट्रेटर डॉ. आर. जी. नानिवडेकर, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रेयाचा विशेष सत्कार करून तिला गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

लेकीच्या या यशाची वार्ता गावात समजताच ग्रामस्थांच्या आनंदाला पारावर उरला नाही. ग्रामस्थांनी भरभरून तिचे कौतुक केले. गावातील सर्वच व्हाट्सअप ग्रुप मध्ये तर तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव झाला. ‘तिने यशाचा हा चढता आलेख कायम ठेवून एमबीबीएसची पदवी घ्यावी, आणि नामांकित डॉक्टर म्हणून नावारूपास यावे, गावचे नाव उज्ज्वल करावे’, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यासाठी ग्रामस्थांनी तिला भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत. ग्रामस्थांप्रमाणेच राजकीय, सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तिचे व तिच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे. चांगभलं न्यूज समूहाकडूनही तिचे विशेष अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी तिला खूप सार्‍या शुभेच्छा !!

विश्वास सार्थ ठरवणार
वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षात माझ्याकडून उत्तम कामगिरी झाली आहे. सध्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्यामुळे हा यशाचा आलेख चढता ठेवावा, अशा कुटुंबीय, गुरुजन व ग्रामस्थांच्या निश्चित माझ्याकडून अपेक्षा आहेत. ही अपेक्षा मी पूर्ण करेन, असा त्यांना विश्वास आहे. शैक्षणिक गुणवत्तेच्या पातळीवर आणखी परिश्रम घेऊन उत्तुंग भरारी घेत हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवणार आहे.
– श्नेया हर्षवर्धन मोहिते

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close