विजयाची सभा रेठरे बुद्रुक मध्येच घेणार ; शशिकांत शिंदे
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
दिल्लीत माणूस तुमचाच जाणा…उसाच्या प्रश्नावर मीच बोलणार…इथेनॉलच्या प्रश्नावर मीच बोलणार… कपाशीच्या प्रश्नावर मीच बोलणार…कारण मी कारखानदार नाही मी कामगार आहे, महत्वाचे म्हणजे विजयाची सभा रेठरेत याच मैदानावर घेणार, असे प्रतिपादन इंडिया आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी केले.
रेठरे बुद्रुक तालुका कराड येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते , कराड दक्षिण राष्ट्रवादीचे (शरद चंद्र पवार) अध्यक्ष संतोष पाटील, युवा नेते जयेश मोहिते, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव मोहिते, माजी जि. प. सदस्य बंडानाना जगताप, भानुदास माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शशिकांत शिंदे म्हणाले, मी केवळ बोलणारा नेता नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा कार्यकर्ता आहे. मी निवडणुकीपुरते काम करत नाही आणि मी विझणार नाही, तुम्ही मला फक्त तेवत ठेवा. आज जिल्ह्यातले सगळे दिग्गज एकत्र आले असले तरी जनतेने ठरवले तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचाच उमेदवार विजय होईल.
अविनाश मोहिते म्हणाले, शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य आणि तळागाळातून आलेले नेतृत्व आहे. कष्टकऱ्यांच्यासाठी त्यांची धडपड नेहमी सुरू असते. त्यामुळे या निवडणुकीत ते निश्चित मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा मला विश्वास आहे.
प्रारंभी स्वर्गीय पैलवान कापूरकर यांच्या समाधीचे शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत दर्शन घेतले. युवा नेते जयेश मोहिते यांनी शशिकांत शिंदे यांचे स्वागत केले. संतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले.