ही निवडणूक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची म्हणून आगळीवेगळी ; माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील – changbhalanews
राजकिय

ही निवडणूक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची म्हणून आगळीवेगळी ; माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील

आ. शशिकांत शिंदे म्हणजे कामगारांसाठी लढणारा लढवय्या

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
2024 ची लोकसभेची निवडणूक ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची निवडणूक आहे म्हणूनच ही आगळीवेगळी निवडणूक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी सहकार मंत्री , आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेले आमदार शशिकांत शिंदे हे यशवंत विचार जपणारे, कामगारांसाठीचे लढवय्या नेतृत्व आहे, त्यांना विजयी करण्याचा कराडमधून निर्धार करूया, असे आवाहनही आमदार पाटील यांनी केले.

45 सातारा लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवडणूक प्रचारार्थ आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी कराड शहरातील यशवंत विचारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगराध्यक्ष विद्याराणी साळुंखे, एडवोकेट सतीश पाटील , माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव डुबल, सुभाषराव पाटील, माजी नगरसेवक अरुण जाधव, सौरभ पाटील, कांतीलाल शेठ, मझहरभाई कागदी, जयंतकाका पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीच्यावतीने उमेदवारीसाठी सर्वे घेण्यात आला. त्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी तब्येतीमुळे असमर्थता दर्शवली , मलाही विचारण्यात आले होते मात्र सह्याद्री साखर कारखान्याचा विस्तार आणि सहप्रकल्पाची कामे आपण हाती घेतली असून लोकांनी दिलेली जबाबदारी आपल्याला पूर्ण करावयाची आहे त्यामुळे मी ही उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. त्यानंतर आ. शशिकांत शिंदे यांचे नाव पुढे आले आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. शशिकांत शिंदे यांनी पूर्वीच्या जावली मतदारसंघाचे आणि त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी मंत्री म्हणून ही काम केले आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांचा मुंबईत राहणाऱ्या सातारकरांशी चांगला संपर्क आहे, हा कामगारासाठी लढणारा लढवय्या नेता असून यशवंत विचार जोपासणारे नेतृत्व आहे. आज राज्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे नाव घेतल्याशिवाय एकही सभा सुरू होत नाही. कराड ही यशवंत विचाराची भूमी आहे. त्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. ती ओळखून या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवून त्यांना विजयी करूया.

कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे…
सातारा लोकसभा मतदारसंघात कराड उत्तर मधून मी स्वतः आणि दक्षिण मधून पृथ्वीराज चव्हाण बाबा हे आम्ही दोन इंडिया आघाडीचे आमदार आहोत. पण इतर मतदारसंघात विरोधी गटाचे आमदार असले तरीही तेथे भाजप विरोधात मतदारांमध्ये सुप्त लाट आहे. कराड दक्षिण मतदार संघात 3 लाख 3 हजारांवर मतदार असून एकट्या कराड शहरात 66,187 इतके मतदार आहेत, 61 बुथ आहेत, या प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केले.

जयवंत पाटील म्हणाले, ही निवडणूक हुकूमशाही विरुद्धची निवडणूक आहे. सर्वत्र लोकशाही धोक्यात आली आहे. कराड शहरात भाजपच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. तो मताव्दारे व्यक्त झाला पाहिजे. यासाठी प्रत्येकाने कामाला लागावे.

दोन हत्ती चार जणांना भारी….
सातारा लोकसभा मतदारसंघात शंभुराज, शिवेंद्रराजे, मकरंदआबा, आणि महेश शिंदे असे चार आमदार असल्याचे विरोधी उमेदवारांचे नेते सांगत आहेत, मात्र आमचे दोन हत्ती (आमदार बाळासाहेब पाटील व आमदार पृथ्वीराज चव्हाण) चार जणांना भारी आहेत, अशी शाब्दिक टोलेबाजी नाना खामकर यांनी यावेळी केली.

आनंदराव लादे, मझहर कागदी, सौरभ पाटील, विद्याराणी साळुंखे यांनीही मनोगत व्यक्त केले. नंदकुमार बटाणे यांनी प्रास्ताविक केले तर माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी आभार मानले.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close